नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सहा महिन्यांत देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) किंमती पेट्रोल वाहनांच्या बरोबरीने होतील, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. कन्व्हर्जन्स इंडिया आणि स्मार्ट सिटीज इंडिया एक्स्पोला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली.
नितीन गडकरी म्हणाले की, २१२ किमी लांबीच्या दिल्ली-डेहराडून एक्सेस कंट्रोल्ड एक्स्प्रेसवेचे बांधकाम पुढील तीन महिन्यांत पूर्ण केले जाईल. किफायतशीरपणा, प्रदूषणमुक्त आणि स्वदेशी उत्पादन म्हणून ईव्ही वाहनांचा आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देणे हे सरकारचे धोरण असल्याचे ते म्हणाले. भारताला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी देशाला पायाभूत सुविधा क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
नितीन गडकरी म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेचे भवितव्य खूप चांगले असून स्मार्ट शहरे आणि स्मार्ट वाहतुकीसाठी सरकार कटिबद्ध आहे. ते म्हणाले की, आम्ही इलेक्ट्रिकवर आधारित जलद मास ट्रान्सपोर्टेशनवर काम करत आहोत. नितीन गडकरी यांनी रस्तेबांधणीचा खर्च कमी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली.