लातूर : प्रतिनिधी
शासनाच्या वतीने रास्तभाव दुकानांतून देणयात येणारे मोफत धान्य मिळण्यासाठी प्रत्येक रेशनकार्डधारकांना स्वत:सह कुटूंबाची ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मागील एक वर्षापासून ही योजना सुरु आह. यात आता सहजताही आणलेली आहे. परंतू, कार्डधारकांनी ई-केवायसीकडे पाठ फिरवली आहे. यामुळे ज्यांची ई-केवायसी झाली नाही, अशा कार्डधारकांचे मोफत रेशन बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. या महिन्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे. ३० एप्रिलपर्यंत ई-केवायसी करण्यास केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. लातूर जिल्ह्यात अद्यापही तब्बल २.५१ टक्के लाभार्थ्यांची ई-केवायसी अपुर्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ५ लाख ८८ हजार ५९३ लाभार्थ्यांचे मोफत धान्य बंद होणार आहे.
केंद्र सरकारच्या वतीने देशातील ८० टक्के लाभार्थ्यांना पुढील पाच वर्षे मोफत धान्य देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. त्यानूसार रेशनचे वाटप सुरु आहे. परंतु, यात काही गैरप्रकार उघड होत असल्याने प्रत्येकाची ई-केवायसी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील वर्षभरापासून ही योजना सुरु असताना अद्यापही अनेक लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नसल्याचे समोर येत आहे. यामुळे केंद्र सरकारने आता ई-केवायसी नसलेल्या लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
ई-केवायसीसाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. ज्या लाभार्थ्यांची ई-केवायसी झाली नाही, त्यांना ३० एप्रिलपर्यंत केवायसी करण्यास मुदवाढ देण्यात आलेली आहे. ई-केवायसी केली तरच मोफत धान्य मिळणार आहे. मागील एक वर्षापासून ई-केवायसी करण्यास सरकारने प्रत्येक कार्डधारकांना सांगत आहे. काहीजण या योजनेकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळेच लातूर जिल्ह्यात अद्यापही बहुतांश लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. लाभार्थ्यांनी ३० एप्रिलपर्यंत ई-केवायसी करुन घ्यावी, अन्यथा मोफत रेशन कायमचे बंद होण्याची शक्यता आहे.