लातूर : प्रतिनिधी
वीजहानी कमी करण्याच्या दृष्टीने अतिवीजहानी असलेल्या वीजवाहिन्यावरील वीजचोरी विरोधात एप्रिल, मे व जून या गेल्या तीन महिन्यात राबविलेल्या विशेष महामोहीमेत लातूर परिमंडळांतर्गत येणा-या सर्व विभागाच्या वीजचोरी बहूल भागात राबवलिेल्या धडक कारवाईत तब्बल ६९३ वीजचोरून वापरणा-यांवर महावितरणने आक्रमक कारवाई केली आहे. ७१ लाख ४६ हजार रुपयांची वीजचोरी उघड झाली असून या कारवाईत आकडे टाकून वापरण्यात आलेल्या शेगड्या, हीटर व केबल जप्त करण्यात आले आहेत.
नियमीत वीजबील भरणा-या वीजग्राहकांना अखंडीत व योग्यदाबाचा वीजपुरवठा व्हावा या उद्देशाने वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार जास्त वीजहानी असलेल्या वीजवाहिन्यांवरील वीजचोरीचा पर्दाफाश करण्यासाठी लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी, बीडचे अधीक्षक अभियंता प्रेमसिंग राजपूत तसेच धाराशिव मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय आडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच विभागात धडक मोहीम हाती घेतली असून जास्त लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्यांतील वीजवाहिन्यांवर आकडे टाकून वीजचोरी करणा-या व मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरून वापरणा-या विरोधात धडक कारवाई करण्याचे सर्व उपविभागांना निर्देश दिले आहेत.
त्यानुसार गेल्या तीन महिन्यात राबविलेल्या धडक कारवाईत संशयास्पद अशा वीजग्राहकांची तपासणी केली असता ६९३ ग्राहक विविध मार्गाने वीजचोरी करत असल्याचे उघड झाले आहे. तब्बल ७१ लाख ४६ हजार रूपयांची वीजचोरी झालेली आहे. यामध्ये लातूर जिल्हयातील ३२३ वीजग्राहक वीजचोरी करत असल्याचे आढळून आले. तर बीड जिल्हयातील २०६ वीजग्राहक तसेच धाराशिव जिल्हयातील १६४ वीजग्राहक वीजचोरी करत असल्याचे आढळून आले. यासर्व वीजचोरांवरती वीजकायदा २००३ अनुसार कलम १३५ व १२६ अन्वये कारवाई करण्यात आली असून वीजचोरीच्या बिलाची व दंडाची बीले तयार करून देण्याची कारवाई सुरू असून दिलेली बिले न भरल्यास वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. या धडक कारवाईत विभागातील सर्व अभियंते व कर्मचा-यानी सहभाग नोंदवला. यापुढेही वीजचोरी विरोधातील मोहिम अधिक कडक स्वरूपात राबवली जाणार असून वीज कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.