23.1 C
Latur
Thursday, September 18, 2025
Homeपरभणी७५ वर्षांत पहिल्यांदाच मुस्लिम महिला उपसरपंचाच्या हस्ते ध्वजारोहण

७५ वर्षांत पहिल्यांदाच मुस्लिम महिला उपसरपंचाच्या हस्ते ध्वजारोहण

सरपंच दिलीपराव देशमुख यांचा पुढाकार, झरी ग्रामस्थांसाठी ठरला ऐतिहासीक क्षण

सुधीर गो. बोर्डे
परभणी : प्रतिनिधी
तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या झरी ग्रामपंचायतची स्थापना १९५१ साली झाली. या ग्रामपंचायत स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत असून मराठावाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त बुधवार, दि.१७ सप्टेंबर रोजी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रम विशेष लक्षणीय ठरला. अमृत महोत्सव साजरा करणा-या या ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी विराजमान असलेल्या गावातील मुस्लिम समाजाच्या राईन डी. के. इनामदार यांना ध्वजारोहणाचा मान मिळाला असून असा मान मिळविणा-या गावातील त्या पहिल्याच मुस्लिम महिला आहेत.

परभणी तालुक्यातील झरी ग्रामपंचायतची लोकसंख्या जवळपास २० हजार आहे. ग्रामपंचायत सदस्य असलेल्या गावातील मुस्लिम समाजाच्या राईन डी. के. इनामदार यांना उपसरपंचपदी संधी देण्याचा शब्द स्व. गजाननराव देशमुख यांनी दिला होता. स्व. गजाननराव देशमुख यांच्या अकाली निधनानंतर गजानन देशमुख मित्र मंडळ व ग्रामपंचायत सदस्यांनी स्व.गजाननराव देशमुख यांनी दिलेला शब्द पाळत इनामदार यांना उपसरपंचपदी विराजमान केले.

ग्रामपंचायतच्या वतीने मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त बुधवारी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गावचे सरपंच दिलीपराव देशमुख यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवत स्वत: ध्वजारोहण करण्याऐवजी मुस्लिम समाजाचे प्रतिनिधीत्व करणा-या उपसरपंच राईन डी. के. इनामदार यांना ध्वजारोहण करण्याचा मान दिला. या बद्दल इनामदार परीवारासह ग्रामपंचायत महिला सदस्य, गावातील महिला व मुस्लिम समाज बांधवांनी सरपंच दिलीपराव देशमुख यांचे आभार मानले आहेत. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी सतिश बनसोडे यांनी ध्वजारोहणासाठी मार्गदर्शन केले.

यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष ब्रह्मानंद सावंत, डॉ. भिकुदास लाटे, माजी सरपंच दिपकराव देशमुख, ग्रामपंचायत सदस्य ज्योती हेंडगे, गोदावरी अंबोरे, पुनम मठपती, केशरबाई मठपती, रेवती जगाडे, जनाबाई नन्नवरे, सुमैया इनामदार, रेष्मा गवळी, कैलास रगडे, अशोक चोरमले, सुनील देशमुख, अभिजीत परीहार, आसेफ कुरेशी, बचत गटाच्या महिला, अंगणवाडी कार्यकर्त्या, सेविका, पोलिस पाटील लक्ष्मण नवले व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR