कराची : वृत्तसंस्था
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज आमिर जमाल अडचणीत सापडला आहे. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन आमिर आणि त्याच्या काही सहका-यांनी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामध्ये आमिरला ४ लाख ३३ हजार रुपये इतका मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. कारण आमिर जमालच्या टोपीवर ‘८०४’ हा आकडा लिहिण्यात आला होता.
दरम्यान, पाकिस्तानमधील वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने अनेक पाकिस्तानी खेळाडूंविरोधात नियम मोडल्याबद्दल दंड ठोठावला असून सर्वाधिक मोठी शिक्षा आमिर जमालला देण्यात आली आहे. आमीर जमालच्या टोपीवर ‘८०४’ हा आकडा लिहिण्यात आल्याचे दिसून आल्यानंतर त्याच्यावर नियम मोडल्याचा ठपका ठेवत एवढा मोठा दंड आकारण्यात आला. हा आकडा पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्याशी संबंधित आहे.
पीटीआय या पाकिस्तानमधील राजकीय पक्षाचे सर्वेसर्वा असलेले आणि देशाचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटकेत आहेत. त्यांचा कैदी क्रमांक ८०४ असा आहे. हा क्रमांक आपल्या टोपीवर लिहून आमिर जमालने इम्रान खान यांना पाठिंबा दर्शवण्याचा प्रयत्न केला. मात्र राजकीय पार्श्वभूमी असलेले चिन्ह किंवा मजकूर मैदानावर वापरल्याचा ठपका ठेवत आमिर जमालला दोषी ठरवण्यात आले.
मैदानावर राजकीय भूमिका रेटण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणामुळे आमिर जमालला पाकिस्तानच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातही स्थान देण्यात आले नव्हते. राजकीय भूमिकांना खेळाच्या मैदानावर कोणतेही स्थान देता येणार नाही, अशी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाची भूमिका असल्याने आमिर जमालला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातूनही वगळण्यात आले.