मुंबई : प्रतिनिधी
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे तिथे अडकलेल्या ८३ पर्यटकांना आज (२४ एप्रिल)महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी (२२ एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यात महाराष्ट्रातील ६ नागरिकांचाही समावेश आहे. दरम्यान, दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आणि सूचनांनुसार, महाराष्ट्रातील पर्यटकांना श्रीनगरहून मुंबईत परत आणण्यासाठी एका विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. इंडिगोचे हे विमान गुरुवारी (२४ एप्रिल) ८३ पर्यटकांना मुंबईत परत आणेल.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करताना म्हटले की, गुरुवारी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यासाठी प्रवाशांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यासाठी पूर्ण सहकार्य करत आहेत. या विशेष विमानाचा सर्व खर्च राज्य सरकार करेल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.