लातूर : प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखेने शास्त्रोक्त पध्दतीने तपास करीत अवघ्या आठ तासांच्या आत खुनातील आरोपीस अटक केली आहे. लातूर तालुक्यातील बोपला येथील दयानंद भगवान काटे वय ५५ याचा अज्ञात व्यक्तीने मारहाण करुन खुन केल्याची घटना दि. १४ मे रोजी घडली होती. मयताच्या मुलाने फिर्याद दिल्यावरुन लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले हे पथकासह घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा ठरवून गोपनीय बातमीदार नेमून शास्त्रोक्त पध्दतीने तपासाला सुरुवात केली.
सदर पथकाने गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून तपासाची दिशा निश्चीत करुन आटोकाट प्रयत्न करत दयानंद काटे याचे मारेकर-याचा शोध घेतला. तेव्हा मयत दयानंद काटे याचा सख्खा लहान भाऊ देवानंद भगवान काटे वय ४३ वर्षे रा. बोपला यास दि. १५ मे रोजी रात्री ९ वाजता बोपला येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्याने त्याच्या अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन शेतीच्या बांधावरील भांडणाचा राग मनात धरुन सख्या मोठ्या भावाचा खून केल्याचे कबुल केले आहे. गुन्ह्याचा तपास लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे हे करीत आहेत.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस अंमलदार अर्जुन राजपूत, युवराज गिरी, राहुल सोनकांबळे, राजेश कंचे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, रियाज सौदागर, संतोष देवडे, गणेश साठे, शैलेश सुडे यांनी केलेली आहे.