गतवर्षीचा पीकविमा, डीबीटीद्वारे आज रक्कम जमा होणार
पुणे : प्रतिनिधी
शेतक-यांच्या खात्यांवर उद्या ९२१ कोटी जमा होणार आहेत. पंतप्रधान पीकविमा योजनेतील मागील वर्षीचे खरीप आणि रबी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसानभरपाई म्हणजेच सोमवारी (दि. ११) शेतक-यांच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे. यामध्ये खरिपातील नुकसान भरपाई ही ८०९ कोटी आहे तर रबीतील ११२ कोटी रुपये असे एकूण ९२१ कोटी रुपये राज्यातील शेतक-यांना मिळणार आहेत.
याआधी पीकविम्याची नुकसानभरपाई कंपन्यांकडून त्या-त्या वेळी थेट शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात येत होती; मात्र पीएम किसान सन्मान निधी वाटपाच्या धर्तीवर उद्या पहिल्यांदाच नुकसानभरपाईच्या रकमेचे वाटप होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतक-यांच्या संलग्न खात्यांमध्ये डीबीटीद्वारे भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे.
नुकसान भरपाईचे निकषही कठोर केल्यामुळे शेतक-यांना चांगली नुकसान भरपाई मिळाली. या हंगामातील राज्य सरकारचा विमा हप्ता रखडला होता. त्यामुळे शेतक-यांचीही नुकसानभरपाई प्रलंबित होती. राज्य सरकारने १ हजार २८ कोटी रुपयांचा हा हप्ता १३ जुलै रोजी कंपन्यांकडे जमा केला. त्यामुळे शेतक-यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
या हंगामात ९५ लाख ६५ हजार अर्जदार असलेल्या शेतक-यांना ४ हजार ३९७ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येणार होती. त्यापैकी ८० लाख ४० हजार शेतक-यांना ३ हजार ५८८ कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप करण्यात आले होते तर १५ लाख २५ हजार शेतक-यांना ८०९ कोटी रुपयांच्या भरपाईचे वाटप झालेले नव्हते.
नुकसानभरपाई वाटपाचा
आज राजस्थानात कार्यक्रम
केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आता ही ९२१ कोटी रुपयांची नुकसानभरपाई शेतक-यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. नुकसानभरपाई वाटपाचा मुख्य कार्यक्रम राजस्थानमधील झुंझुनू येथे पार पडणार असल्याची माहिती कृषि विभागाने दिली.