बंगळूर : वृत्तसंस्था
विविध औषध कंपन्यांनी तयार केलेल्या ९ इंजेक्शनवर कर्नाटकसह देशभर बंदी घालण्याची मागणी आरोग्यमंत्री दिनेश गुंडुराव यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे केली आहे. सर्व राज्यांना एकाचवेळी धोकादायक औषधांबाबत कळवून तत्काळ त्यांचा वापर थांबवण्यासाठी विशेष व्यवस्था करावी, अशीही मागणी केली आहे.
१ जानेवारी ते १६ फेब्रुवारी या काळात राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये काही औषधांच्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ९ प्रकारची औषधे सुरक्षित नसल्याचे दिसून आले. त्यामुळे तत्काळ या औषधांवर बंदीची गरज असल्याचे मंत्री गुंडुराव यांनी म्हटले आहे. ही औषधे इंजेक्शनद्वारे रुग्णाला दिली जातात. चाचण्यांमध्ये ती असुरक्षित असल्याचे दिसून आल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळ करण्यासारखे होईल.
मंत्री गुंडुराव यांनी नड्डा यांना पत्र पाठवले आहे. याआधीच संबंधित कंपन्यांची इंजेक्शन्स, औषधे देशातील विविध ठिकाणी पाठवण्यात आली आहेत. कर्नाटकात त्या औषधांच्या चाचणीमध्ये दोष आढळला आहे. याबाबतची अंतिम चाचणी होईपर्यंत ती सर्व औषधे परत मागवून घ्यावी. तोपर्यंत त्या औषधांवर निर्बंध घालावेत, असे आवाहन गुंडुराव यांनी केले आहे.
कर्नाटकात कारवाई : याआधी कर्नाटकाने पश्चिम बंगालमधील पश्चिम बंगाल फार्माकडून तयार केलेल्या इंजेक्शनच्या विक्रीवर बंदी घातली होती. या इंजेक्शनमुळे बळ्ळारीतील जिल्हा रुग्णालयात पाच बाळंतिणींचा मृत्यू झाला होता.
बंदीची शिफारस केलेले इंजेक्शन्स
मेट्रोनीडाझोल (फार्मा इम्प्लेक्स लॅबोरेटरी, बरुईपूर-प. बंगाल), डिक्लोफिनॅक सोडियम (अल्फा लॅबोरेटरीज, इंदूर-मध्य प्रदेश), डेक्स्ट्रोस (रुसोमा लॅबोरेटरीज, इंदूर-मध्य प्रदेश), मेट्रोनिडाझोल (आयएचएल लाईफसायन्सेस प्रा. लि. खारगोन-मध्य प्रदेश), फ्रूसेमाईड (पॅकसन्स फार्मास्युटिकल्स, बहाद्दूरगड-हरियाणा), पायपेरासिलीन व टॅझोबॅक्टम (मॉडर्न लॅबोरेटरीज, इंदूर-मध्य प्रदेश), कॅल्शियम ग्लुकोनेट आणि ओंडान्सेट्रॉन (रिगेन लॅबोरेटरीज हिस्सार-हरयाणा), ऍस्ट्रोपाईन सल्फेट (मार्टिन अँड ब्राऊन बायोसायन्सेस, सोलन-हिमाचल प्रदेश).