लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता कर थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहिम सुरु केलेली आहे. कर थकबाकीदारांविरुद्ध गतवर्षी मोठ्या प्रमाणात कार्यवाही करण्यात आली होती. नवीन वर्षातही ही मोहीम सुरु आहे. दि. ३ फेब्रुवारी रोजी दिवसभरात ९ नळ खंडित करण्यात आले तसेच एक मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
कर संकलन व कर आकारणी विभाग लातूर शहर महानगरपालिका यांच्या वतीने वर्षाच्या सुरुवातीपासूनच मालमत्ताधारकासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार वेळोवेळी विविध प्रकारचे सुटची योजना लागू करण्यात आल्या होत. त्यानंतर दिं. १० फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण कराचा भरणा करणा-या करदात्यास लातूर शहर महानगरपालिकेमार्फत प्रोत्सानपर बक्षीस योजना राबवण्यात येत आहे. या उपरही जे मालमत्ताधारक थकीत मालमत्ताकराचा व पाणी पट्टीकराचा भरणा करणार नाहीत, अशा मालमत्ताधारकांवर महानगरपालिकेच्या वसूली पथकामार्फत मालमत्ता सील करणे, आटकाणी करणे तसेच नळ जोडणी खंडीत करणे या स्वरुपाची कार्यवाही हाती घेण्यात आली असून सोमवारी क्षेत्रीय कार्यालय अ, क, मध्ये कर वसूलीसाठी कारवाई करण्यात आली आहे.
क्षेत्र क्र. अ: – २७३६०६ रुपये थकीत कराच्या वसूलीसाठी दोन नळ जोडणी बंद करण्यात आली तसेच जप्तीची कार्यवाही करताच एका मालमत्ताधारकाकडून ६४०६८ रुपयांचा धनादेश प्राप्त झाला. क्षेत्र क्रं. क – ४१४७५ रुपये थकीत कराच्या वसूलीसाठी सात नळ जोडणी बंद करण्यात आली. तरी जे मालमत्ताधारक मालमत्ता सील करुनही मुदतीमध्ये कराचा भरणा करणार नाहीत, अशा मालमत्ता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमनुसार मालमत्तांचा लिलाव महानगरपालिकेमार्फत करून वसूली करण्यात येणार आहे. तरी थकबाकीदार मालमत्ताधारकानी कर भरणा करुन सहकार्य करावे व होणारी जप्ती, लिलाव सारखी कटू कार्यवाही टाळावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे.