मुंबई : रोहित पवार यांनी मंत्र्यांचे विदेश दौरे आणि राज्यातील नोकर भरतीच्या परीक्षेत होणा-या घोटाळ्यांवरून सरकारवर टीका केली आहे. याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. फडणवीसांच्या ओएसडीच्या अनेक कंपन्या असून, त्यांच्या संबंधित कंपन्यांना परीक्षेची कामं मिळत आहेत. तसेच, फडणवीसांच्या ओएसडीच्या एका विदेशी दौ-यावर १ कोटी ८८ लाखांचा खर्च झाला असल्याचे देखील रोहित पवार म्हणाले आहेत.
याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, २३ नोव्हेंबर २०२३ ला आम्ही एमआयडीसीकडे काही माहिती मागवली होती. यामध्ये विदेशात कोणकोणते प्रवास झाले आणि त्यासाठी किती खर्च झाला याची माहिती मागवण्यात आली. दाओसमध्ये ३१ लाख रुपये खर्च झाला. आत्तापर्यंत ४२ ते ४५ कोटी रुपये वेगवेगळ्या विदेशी दौ-यांवर खर्च झाला आहे. तैवान देशात मंत्रिमहोदय गेले नव्हते, केवळ अधिकारी तिथे गेले होते. देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी कौस्तुभ ढवसे कशासाठी गेले होते. यासाठी १ कोटी ८८ लाख रुपये खर्च झाला. इतका खर्च कसा काय झाला? तुम्ही प्रायव्हेट जेटने गेले होते का? कारण ५ लोकांवर ७० लाख रुपये कसा काय केला? असा प्रश्न रोहित पवारांनी केला आहे.
एमआयडीसीला अधिकचा तपशील मागवला आहे. तैवान येथे एक भारतीय व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला थेट पैसा देण्यात आला. ८ महिन्यांपूर्वी यांनी जो खर्च केला तो कसा दाखवायचा असा प्रश्न आता यांच्यासमोर उभा राहिला आहे. आता मागच्या तारखेचे पत्र देऊन खर्च दाखवण्याचा प्रयत्न कौस्तुभ ढवसे करत आहेत. जपानला देवेंद्र फडणवीस गेले, तिथे खर्च एमआयडीसीने केला होता. तिथे देखील कौस्तुभ ढवसे कशासाठी गेले होते याचे उत्तर द्यावे? असेही रोहित पवार म्हणाले.
कौस्तुभ ढवसेच्या एका प्रवासासाठी ३० लाख रुपये
लंडनमध्ये देखील यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला. उदय सामंत जर्मनीला गेले होते. तिथे एका कंपनीने आश्वासन दिले की, आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करत आहोत, मात्र प्रत्यक्षात कोणताही करार झालेला नाही. पुन्हा एकदा दाओसला सगळे नेते जाणार आहेत. या दौ-याला एक व्यक्ती जाणार आहे. जो आत्ता सतेत नाही. परंतु तो दौ-याला जाणार आहे. विशेष म्हणजे फडणवीस यांचे ओएसडी कौस्तुभ ढवसे एका प्रवासासाठी ३० लाख रुपये खर्च करतात. जो व्यक्ती संबंधित खात्याशी संबंधित देखील नाही, असाही आरोप रोहित पवार यांनी केला आहे.