22.4 C
Latur
Tuesday, July 23, 2024
Homeराष्ट्रीयफूटपाथवर सामान विकणा-या महिलेला १ कोटीची लॉटरी

फूटपाथवर सामान विकणा-या महिलेला १ कोटीची लॉटरी

नवी दिल्ली : फूटपाथवर लहान मुलांचे सामान विकणा-या ७२ वर्षीय सुकुमारी अम्माला नेहमी स्वत:चे हक्काचे घर असावे असे स्वप्न होते. मात्र कमाई इतकी जास्त नव्हती ज्याने हे स्वप्न पूर्ण होईल. त्यामुळेच सुकुमारी अम्मा लॉटरी खरेदी करून नेहमी नशीब आजमावत होती. १५ मे २०२४ ला सुकुमारी अम्माचे नशीब उजळले. तिने एक दिवसापूर्वी लॉटरीचे तिकिट खरेदी केले होते. त्यावर १ कोटी बक्षीस लागले. मात्र ही रक्कम सुकुमारी अम्माला मिळण्याअगोदरच तिची फसवणूक झाली.

सुकुमारी अम्माने १४ मे रोजी विक्रेत्याकडून एका सीरिजची १२ तिकिटे खरेदी केली होती. त्या तिकिटासाठी महिलेने १२०० रुपये दिले होते. विक्रेत्याला जेव्हा कळाले सुकुमारी अम्माला १ कोटीची लॉटरी लागली आहे तेव्हा त्याच्या मनात लालसा आली. त्याने सुकुमारी अम्माला तुमच्या सर्व तिकिटांवर १००-१०० रुपये बक्षीस लागल्याचे सांगितले. त्यामुळे सुकुमारी अम्माच्या पदरी पुन्हा निराशा पडली. मात्र लॉटरी विक्रेता त्याच्या घरी आनंदात पोहचला आणि घरच्यांना त्याला १ कोटीची लॉटरी लागल्याचे सांगितले.

विक्रेत्याच्या घराशेजारी आणखी एक लॉटरी विक्रेता राहायचा. त्याला ठाऊक होते की, ज्या तिकीटावर १ कोटीची लॉटरी लागली ती सुकुमारी अम्माने खरेदी केली होती. त्याने सुकुमारी अम्माला हा प्रकार सांगितला. त्यानंतर महिलेने पोलिस ठाणे गाठत त्या विक्रेत्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करत लॉटरी विक्रेत्याला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केली. मात्र विक्रेत्याने लॉटरीच्या तिकिटामागे त्याचे नाव लिहून बँकेत जमा केले होते.

दरम्यान, सुकुमारी अम्माच्या तक्रारीवरून विक्रेत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र कोर्टात साम्यंजस्याने लॉटरी विके्रत्याविरोधातला खटला मागे घेण्यास सुकुमारी अम्मा तयार झाली. त्यानंतर विक्रेत्याने तिला जिंकलेली लॉटरी तिकिट परत केली, त्यानंतर ही तिकिट पुन्हा सुकुमारी अम्माने बँकेत जमा केली. जिंकलेल्या रक्कमेवरील टॅक्स कापल्यानंतर सुकुमारी अम्माच्या हाती ६३ लाख रुपये आले आणि अशाप्रकारे फूटपाथवर सामान विक्री करणारी ७२ वर्षीय अम्मा लखपती झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR