लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील सर्वांगीण विकासात महत्वाचे योगदान असलेल्या विलास सहकारी साखर कारखाना युनीट १, वैशालीनगर, निवळी या कारखान्याने चालू गळीत हंगामात प्रती दिवस ५ हजार मे.टन ऊस गाळप करुन २० दिवसांत १ लाख मे. टन ऊस गाळप करुन ऊस गाळपाचा उच्चांक केला आहे. विलास साखर कारखान्याने मागील ऑफ सिझन काळात मशिनरी आधुनिकीकरणाची कामे हाती घेवून ४ महिन्याच्या आत संपूर्ण आधुनिकीकरणाचे कामे पूर्ण करुन नियोजित वेळेत कारखाना ऊस गाळपासाठी सज्ज करुन आधुनिकीकरणानंतर सध्या ५ हजार मे. टन प्रती दिन ऊस गाळप सुरु आहे. तसेच को-जनरेशन प्रकल्पातून ९.८ मे. वॅट प्रती तास प्रमाणे विक्रमी वीज निर्यात सुरु आहे. त्याचप्रमाणे डिस्टीलरी प्रकल्प पुर्ण क्षमतेने सुरु आहे. माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रियमंत्री विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून, सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नियोजनाने लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी सहकार आणि साखर उदयोगाची सुरुवात झाली.
शेतक-यांच्या सेवेसाठी उभा राहीलेल्या या सर्व संस्था यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत. ही वाटचाल माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. या साखर कारखान्यामार्फत ग्रामिण भागाचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. शेतक-यांशी बांधीलकी ठेऊन कारखान्याची वाटचाल चालू असल्यामुळे साखर कारखानदारीतील अनेक ऊस गाळप आणि ऊसदराचे उच्चांक प्रस्तापित झाले आहेत.
विकासरत्न विलासराव देशमुख यांची प्रेरणा, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे मार्गदर्शन व संस्थापक चेअरमन, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांचे नेतृत्वाखाली विलास सहकारी साखर कारखान्याने उच्चांकी ऊस दर अदा करण्याची परंपरा निर्माण केली आहे. विद्यमान गळीत हंगामात देखील उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा कायम राखली जाणार असल्याची माहिती कारखाना व्यवस्थापनाने दिली आहे. विद्यमान गळीत हंगामात उच्चांकी अंतिम दर देण्यात येणार असून जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणेबाबत विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे व कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी आवाहन केले आहे.
कारखान्याचा दैनिक साखर उतारा ११.१० टक्के
विद्यमान गळीत हंगामात ऊसतोडणी यंत्रणेचा व तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रभावी वापर करुन कारखाना विना स्टॉपेज वेगाने दैनंदीन गाळप करीत आहे. या गळीत हंगामात विलास सहकारी साखर कारखाना युनीट १ कडून आजअखेर १ लाख मे. टन ऊसाचे गाळप करुन ८५ हजार क्विंटल शुभ्र दाणेदार साखरेचे उत्पादन केले आहे. तसेच आजचा दैनिक साखर उतारा ११.१० टक्के आहे.