नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर भाजपच्या १० खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. राजीनामा देणाऱ्या खासदारांमध्ये छत्तीसगडचे गोमती साई, मध्य प्रदेशचे नरेंद्र सिंह तोमर, राकेश सिंह, प्रल्हाद पटेल, रीती पाठक आणि उदय प्रताप सिंह यांचा समावेश आहे. राजस्थानच्या खासदार दिया कुमारी, राज्यवर्धन राठोड आणि किरोरी लाल मीना यांनीही राजीनामा दिला आहे.
राजीनामा दिलेल्या १० खासदारांपैकी ५ मध्य प्रदेश, ३ राजस्थान आणि २ छत्तीसगडचे आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपने २१ खासदारांना उभे केले होते, त्यापैकी १२ विजयी आणि ९ खासदार पराभूत झाले. निवडणुकीत विजयी झालेले १० आमदार बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे राजीनामा देण्यासाठी पोहोचले. ते आता आमदारच राहणार आहेत. निवडणुकीत विजयी झालेले बाबा बालकनाथ आणि रेणुका सिंह हे आणखी दोन खासदार यांनी राजीनामा दिला नाही.
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी या खासदारांच्या शिष्टमंडळासोबत पंतप्रधान मोदी, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या अध्यक्षांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. तर राजस्थानचे खासदार बाबा बालकनाथ आणि छत्तीसगडमधील रेणुका सिंह यांनी राजीनामे दिलेले नाहीत. त्यानंतर भाजप त्यांना राज्यसभेतच ठेवू इच्छित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजस्थान आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत या दोन्ही खासदारांची नावेही समोर येत आहेत.