पंढरपूर : कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल- रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येणा-या भाविकांना मंदिर समितीकडून मुबलक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच विठुरायाचे दर्शन घेण्यापूर्वी अनेक भाविक चंद्रभागेमध्ये स्रान करतात. महिला भाविकांसाठी चंद्रभागा वाळवंटात स्रान केल्यानंतर कपडे बदलण्यासाठी दहा चेजिंग रूमची उभारणी करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा १२ नोव्हेंबरला संपन्न होत आहे. त्याआधी वारकरी आणि भाविक श्री क्षेत्र पंढरपुरात दाखल होत आहेत. वारीला येणारे बहुतेक सर्व भाविक विठुरायाच्या दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीमध्ये स्रान करीत असतात. सदर ठिकाणी महिला भाविकांना कपडे बदलण्याची सोय करण्याच्या दृष्टीने चंद्रभागा नदीपात्रात १० ठिकाणी चेजिंग रूम बसविण्यात आलेल्या आहेत. याशिवाय, महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चेजिंग रूमजवळ २४ तास महिला सुरक्षा कर्मचा-याची नेमणूक करण्यात आली आहे.
मंदिर प्रशासनाकडून उभारण्यात आलेल्या चेजिंग रूमद्वारे एकावेळेस ३० ते ४० महिला भाविक कपडे बदलू शकतात. कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांच्या सुविधेसाठी श्री संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप, पत्राशेड व श्री विठ्ठल सभामंडप येथे चार ठिकाणी हिरकणी कक्षाची (स्तनपान गृह) उभारणी करण्यात आली आहे. याशिवाय, दर्शनमंडप येथे सॅनिटरी नॅपकिनचीदेखील उपलब्धता करण्यात आली असून श्रींच्या दर्शनरांगेत महिला भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिस कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त मंदिर समिती मार्फत महिला स्वयंसेवक नियुक्त करण्यात आलेले आहेत. या यात्रेला येणा-या सर्व वारकरी भाविकांची सेवा करण्यास मंदिर प्रशासन सदैव तत्पर असल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.