बार्शी : शहरातील तेजस इंडस्ट्रीज इलेक्ट्रीक व हार्डवेअर स्टोअरच्या मालकासोबत बनावट दोन किलो सोन्याच्या मण्याच्या माळा विकून १० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. याबाबत शहर पोलिसांत स्वप्निल हिरालाल जैन यांनी त्या दोन्ही अनोळखी महिला व पुरुषाविरुद्ध फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे हिरेमठ हॉस्पिटलनजीक तेजस इंडस्ट्रीज इलेक्ट्रीक व हार्डवेअर स्टोअरचे दुकान आहे. एक अनोळखी पुरुष आणि महिला दुकानात बकेट घेण्यास आले होते. त्यांनी त्यांना पत्नीला दवाखान्यात दाखवायचे आहे. उपचारासाठी पैशाची गरज असल्याचे सांगत माझेकडे जुने सापडलेले सोने आहे.
ते मला विकायचे आहे. कुणी घेणार असेल तर मला कळवा, असे म्हणून त्याने त्याचा मोबाईल नंबर देत वडिलांजवळ १ सोन्याचा मणी दिला व तो निघून गेला. त्यानंतर फिर्यादीने तो सोन्याचा मणी सोनारकडे चेक केला असता दिलेला मणी सोन्याचाच होता. फिर्यादी दुकानामध्ये काम करीत असताना दुकानामध्ये सोन्याचा मणी दिलेले अनोळखी पुरुष व महिला दुकानात आले. तेव्हा त्याने फिर्यादीकडे आणखीन २ सोन्याचे मणी दिले. त्यानंतर फिर्यादी व वडिलांनी ते मणी सोनारकडे चेक केले असता, तेही मणी सोन्याचेच होते. तेव्हा ते सोनेच असल्याची खात्री झाल्याने त्या एक अनोळखी पुरुष व एक अनोळखी महिला यांना जवळील दहा लाख रुपये रोख रक्कम देऊन त्यांच्याकडील २ किलो वजनाचे सोन्याच्या मण्याचे माळा ताब्यात घेतले.
त्यानंतर ते दोघेही अनोळखी तेथून निघून गेले. त्यानंतर दिलेले २ किलो सोने चेक केले असता सोने बनावट असल्याबाबत खात्री झाली. त्यांनतर त्या दोघांचा शहरात परिसरात शोध घेतला. तसेच त्यांचा मोबाईल नंबरवर फोन केला असता तो बंद लागत होता. त्यावेळी खात्री झाली की, सदर अनोळखी पुरुष व अनोळखी महिलांनी आम्हाला खोटे सोने देऊन आमच्याकडील १० लाख रुपये रोख रक्कम घेऊन फसवणूक केल्याची गुन्हा त्या दोन्ही अनोळखी व्यक्ती विरोधात दाखल झाला असून अधिक तपास पोलिस करत आहेत.