13.2 C
Latur
Wednesday, November 19, 2025
Homeमहाराष्ट्रहवामान अंदाजात १०० टक्के अचूकता अशक्य!

हवामान अंदाजात १०० टक्के अचूकता अशक्य!

ही गुंतागुंतीची प्रक्रिया, केंद्रीय पृथ्वीविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांची माहिती

पुणे : प्रतिनिधी
नावीन्यपूर्ण संशोधनाला चालना देऊन तंत्रज्ञान विकसित करून ते सर्वसामान्य माणसांपर्यंत त्यांच्या भाषेत, त्याला समजेल, अशा स्वरुपात पोहोचविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी निवृत्त हवामानशास्त्रज्ञ योगदान देऊ शकतात. शेतकरी, सर्वसामान्यांपर्यंत हवामान अंदाज त्यांच्या भाषेत पोहोचविण्यासाठी यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे, असे मत पृथ्वीविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी मांडले. हवामान अंदाज गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्यात १०० टक्के यश मिळणे अशक्य आहे. त्यात काय मर्यादा आहेत, हे सामान्यांना समजावून सांगितले पाहिजे, असेही ते म्हणाले.

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेत (आयआयटीएम) इंट्रोमेट २०२५ या परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात रविचंद्रन बोलत होते. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा, आयआयटीएमचे संचालक डॉ. सूर्यचंद्र राव, इंडियन मेटिओरॉलाजी सोसायटीचे (आयएमएस) अध्यक्ष डॉ. आनंदकुमार शर्मा यावेळी उपस्थित होते. इंडियन मेटिओरॉलॉजीकल सोसायटीच्या वायूमंडल या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. तसेच इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलबाबत माहिती देण्यात आली.

हवामानाबाबत दिले जाणारे अंदाज देशभरातील शेतकरी, स्थानिक पातळीवर पोहोचवितात का, ते त्यांना समजतात का, याचा अभ्यास करायला हवा. हवामान अंदाज प्रणालीतील उणिवांची रचनात्मक समीक्षा करून उपाय सूचविणे महत्त्वाचे असून, निरीक्षण ते हवामान अंदाजांचे प्रसारण ही साखळी सुधारण्याची गरज आहे. त्यात आयएमएस दुवा म्हणून काम करू शकते. त्यासाठी देश-विदेशातील शास्त्रज्ञ, प्राध्यापकांच्या मदतीने प्रशिक्षण कार्यक्रम राबविता येतील. त्यासाठी निवृत्त शास्त्रज्ञांनी पुढे येऊन प्रस्ताव सादर केल्यास त्यास मंत्रालयाकडून निधी देता येऊ शकेल.

मौसम निरीक्षणात उच्च क्षमता हवी
मिशन मौसम अंतर्गत निरीक्षकणांमध्ये वाढ करून जागतिक पातळी ते ग्रामपंचायतीपर्यंत नेण्यात येत आहेत. या सर्व स्तरावर उच्च क्षमता असायला हवी. काय उपग्रह असावेत, ४ जी नंतर काय हवे, आयओटी सेन्सर्स, प्रत्येक पंचायतीत किमान एक निरीक्षण केंद्र य सगळ््यांचा विचार केला पाहिजे, संख्यात्मक प्रारुपांना मर्यादा आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंगचा समावेश करण्यात येत आहे. मात्र, शेवटचा निर्णय मानवी बुद्धिमत्ताच घेते.

हवामान अंदाजांमध्ये महत्त्वाची आव्हाने
हवामान अंदाजांमध्ये अनेक आव्हाने आहेत. नाऊकास्ट ते दशकापर्यंतचा हवामान अंदाज दिला जातो. मात्र, अचूक हवामान अंदाज मिळावा, ही लोकांची अपेक्षा आहे. २०१९ पासून जिल्हा स्तरावर हवामान अंदाज केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. हवामान प्रारुपातही बदल करण्यात येत आहेत. त्याशिवाय हवामानामुळे होणारे मुख्य व दुय्यम धोकेही सांगितले पाहिजेत. त्यासाठी डिजिटल एकात्मिक प्रणाली असू शकेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR