लातूर : प्रतिनिधी
भारताच्या राज्य घटनेतील ३७१ कलमानुसार मराठवाड्यातील संपूर्ण मराठा जातीचा ओबीसीमध्ये समावेश करावा व तशा प्रकारचा कायदा करावा तसेच हैदराबाद गॅझेट स्वीकारावे, या मागण्या दि. ११ व १२ मार्च रोजी होणा-या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर कराव्यात अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसी लोकसभा मतदारसंघातून माझ्यासह एक हजार अर्ज भरणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
सन १९०१ मध्ये हैदराबाद स्टेट जनगणनेत मराठवाड्यातील मराठा जातीची नोंद मराठा कुणबी जात म्हणून आहे तसेच सन १९०९ मधील हैदराबादसुद्धा मराठा जातीची नोंद मराठा कुणबी म्हणून आहे. माजी खासदार काकासाहेब कालेलकर आयोगानेसुद्धा हैदराबाद स्टेटमधील मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांत समावेश केला. (खंड-२ पान क्रमांक ५८ यादी क्रमांक ९५ पाहावे) नागपूर करारानुसार मराठवाड्याचा अनुशेष भरून काढणे, आयोगाच्या शिफह्यारशीनुसार व १ मे १९६० रोजी मराठवाडा संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये विनाअट सामील झाला. यामुळे भारताच्या राज्य घटनेतील ३७१ कलमानुसार मराठवाड्यातील संपूर्ण मराठा जातीचा ओबीसीमध्ये समावेश करावा व तशा प्रकारचा कायदा करावा तसेच हैदराबाद गॅझेट स्वीकारावे.
या सर्व मागण्या दि. ११ व १२ मार्च रोजी होणा-या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात याव्यात. सरकारने मागण्या मंजूर नाही केल्या तर केंद्र व राज्य सरकारने घटनेच्या ३७१ कलमानुसार निजाम राजवटीतील ओबीसी असलेल्या मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीत समावेश नाही केला तर मराठवाड्यातील मराठा समाजाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात मराठवाड्यातील आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा समाजाच्या तरुणांचे अस्थी विसर्जन गंगा किनारी दशमेश घाटावर करणार व त्यानंतर गंगाजल घेऊन अन्नपाणी त्याग करून बेमुदत उपोषण करणार आहे. माझ्यासह एक हजार तरुणांचे वाराणसी मतदारसंघातून मोदींच्या विरोधात लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, असेही ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.