धाराशिव : राज्यातील सर्वाधिक गाजत असलेल्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात मंगळवार दि. १५ एप्रिल रोजी येथील विशेष सत्र न्यायालयात पोलिसांनी तब्बल १० हजार पानी दोषारोपपत्र सादर केले असून या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया आता अधिक गतीने सुरू होणार आहे. तपास अधिका-यांनी दोषारोपपत्रात अनेक महत्वाच्या बाबी नोंदविल्या आहेत.
१४ फेब्रुवारी २०२५ रोजी तामलवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी प्रथम गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर आज, गुन्हा घडून ६० दिवसांनी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. तपास अधिकारी गोकुळ ठाकूर यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर करताना अनेक महत्वाच्या बाबींचा समावेश केला आहे. यात घटनास्थळाचे पंचनामे, आरोपींचे जबाब, कॉल डिटेल रेकॉर्ड्स (सीडीआर), मोबाईल लोकेशन डेटा आणि इतर तांत्रिक पुरावे सादर करण्यात आले आहेत.
ड्रग्ज विस्तार पुणे, मुंबई, सोलापूरपर्यंत
या प्रकरणात केवळ तुळजापूर नव्हे, तर मुंबई, सोलापूर आणि पुणे या ठिकाणच्या ड्रग्ज नेटवर्कशी संबंधित धागेदोरे सापडल्याचे दोषारोपपत्रात नमूद आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ स्थानिक मर्यादेत नसून राज्यव्यापी स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकूण ३५ आरोपींवर गुन्हा दाखल
यापैकी १४ आरोपी सध्या अटकेत, तर २१ आरोपी अजूनही फरार आहेत. पोलिसांनी ८० नागरिकांना नोटीसा देऊन चौकशीसाठी बोलावले होते. फरार आरोपींपैकी काहींनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज देखील दाखल केले आहेत.
राजकीय आणि सामाजिक पडसाद
या प्रकरणामुळे तुळजापूरसह संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. सामाजिक आणि राजकीय स्तरावर या घटनेची तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट), भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहे.
न्यायालयीन सुनावणीस गती
दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणाची नियमित सुनावणी सुरू होणार असून न्यायालयीन प्रक्रियेला अधिक वेग येण्याची शक्यता आहे. या प्रकरणात राज्यातील आणखी मोठ्या मासे गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी आता ड्रग्ज पुरवठा करणा-या प्रमुख नेटवर्क्सचा शोध घेण्याची दिशा स्पष्ट केली आहे.