जालना : एकीकडे राज्य सरकारकडून कॉपीमुक्त अभियान जोरदारपणे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, तरीही १२ वीच्या परीक्षा सुरू असताना अनेक परीक्षा केंद्रावर कॉपी केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यातच, आजपासून दहावी बोर्ड परीक्षा सुरू झाल्या असून पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर फुटल्याचे वृत्त आहे. जालन्यातील एका परीक्षा केंद्रावर दहावीचा मराठीचा पेपर फुटला असून पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच उत्तर पत्रिकेच्या झेरॉक्स समोर आल्या आहेत. जालन्यातील बदनापूर येथील प्रकार असून या घटनेने शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे.
एकीकडे शिक्षणमंत्री परीक्षा केंद्रावर भेट देऊन कॉपीमुक्त अभियानाची पाहणी करत आहेत. मात्र, दुसरीकडे मराठवाड्यात पेपर फुटीने खळबळ उडाली असून परीक्षा केंद्रावरील अधिका-यांच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सकाळी ११ वाजता मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच बदनापूर शहरातील सीएसी केंद्रांवर उत्तर पत्रिकाची झेरॉक्स मिळत असल्याच समोर आले आहे. मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्याने शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार बदनापूरमध्ये समोर आला आहे.
राज्यात दहावीच्या परीक्षेला सुरूवात झाली असून जालना जिल्ह्यात १०२ परीक्षा केंद्रावर जवळपास ३२ हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. शासनाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती. मात्र, कॉपीमुक्त परीक्षेचा फज्जा उडताना जालन्यात पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी तरुणांची हुल्लडबाजी देखील पाहायला मिळत आहे.
कॉपी पुरविण्यासाठी तरुणांची हुल्लडबाजी
जालन्यातील मंठा तालुक्यातील तळणी येथे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. परीक्षा केंद्राबाहेर बाहेर तरुणांची हुल्लडबाजी व्हीडीओत कैद झाली आहे. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातल्या तळणी येथे दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉप्या पुरवणा-यांची गर्दी केंद्राबाहेर पाहायला मिळाली, मराठीच्या पहिल्याच पेपरला, केंद्राबाहेर कॉपी पुरवण्यासाठी गर्दी आणि हुल्लडबाजी पाहायला मिळाली. तळणी गावातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रावरचा हा प्रकार आहे, त्यामुळे आत मध्ये परीक्षा देणा-या परीक्षार्थींना बाहेरील गोंधळाचा परीक्षेदरम्यान त्रास सहन करावा लागला.