नवी दिल्ली : पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची मुदत संपल्यानंतर केंद्र सरकारने ११.५ कोटी पॅनकार्ड निष्क्रिय केले आहेत. अद्याप पॅनकार्डशी आधार कार्ड लिंक केले नसेल तर तुम्ही या कठोर कारवाईच्या कक्षेत आला आहात. आता जर तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक करायचं असेल तर तुम्ही दंड भरून ते अॅक्टिव्हेट करू शकता.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माहिती दिली आहे की, आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याची मुदत ३० जून रोजी संपली आहे. त्यामुळे निर्धारित मुदतीत आधार कार्ड आणि पॅनकार्ड लिंक न करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
देशात ७० कोटी पॅनकार्ड
सध्या भारतात पॅनकार्डची संख्या हि ७०.२ कोटीं इतकी आहे. त्यापैकी सुमारे ५७.२५ कोटी लोकांनी आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केले आहे. सुमारे १२ कोटी लोकांनी निर्धारित मुदतीत आधार पॅन लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यापैकी ११.५ कोटी लोकांचे पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात आले आहेत.
नवीन पॅनमध्ये कोणतीही अडचण नाही
नवीन पॅनकार्ड देताना ते आधारशी जोडले जात आहेत. १ जुलै २०१७ पूर्वी पॅनकार्ड बनवणाऱ्यांना आधार कार्डशी लिंक करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. प्राप्तिकर कायद्याच्या कलम १३९ एए अंतर्गत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर एखादी व्यक्ती आपले पॅन कार्ड आधारशी लिंक करू शकली नाही तर आता त्याला १००० रुपये दंड भरून आपले कार्ड पुन्हा सक्रिय करावे लागेल.
पॅन-आधार लिंक न केल्याने अडचण
अशा लोकांना प्राप्तिकर परताव्याचा दावा करता येणार नाही, डिमॅट खाते उघडता येणार नाही आणि म्युच्युअल फंड युनिट खरेदी करण्यासाठी ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरता येणार नाही. ज्यांच्याकडे आधार कार्डशी पॅन लिंक नाही, त्यांना वाहन खरेदीवर अधिक कर भरावा लागणार आहे. एफडी आणि बचत खाते वगळता बँकेत कोणतेही खाते उघडले जाणार नाही. ज्यांचे आधार आणि पॅन कार्ड लिंक नाही, त्यांचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड तयार होणार नाही. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवर अधिक कर असल्याने अशा लोकांना विमा पॉलिसीचा ५० हजार रुपयांपेक्षा जास्त प्रीमियम भरता येणार नाही.
आधार-पॅन लिंक स्टेटस चेक करा
जर तुम्हालाही हे जाणून घ्यायचे असेल की तुमचे आधार कार्ड तुमच्या पॅन नंबरशी लिंक आहे की नाही, तर यूआयडीपॅन < १२ अंकी आधार क्रमांक> < १० अंकी पॅन नंबर> यूआयडी पॅन आपला फोन ५६७६७८ नंबर किंवा ५६१६१ लिहून पाठवा.