मुंबई : विशेष प्रतिनिधी
भाजपच्या ११० उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होणार असल्याचे म्हटले जात आहे. भाजपच्या काही विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे अनेक विद्यमान आमदार, मंत्र्यांच्या पोटात गोळा आला आहे.
भाजपचे शीव-कोळीवाडा येथील विद्यमान आमदार तमिळ सेल्वन यांचे तिकीट कापून त्यांच्या जागी प्रसाद लाड किंवा राजश्री शिरवडकर यांना तिकीट देण्याचा विचार होत आहे. वर्सोव्यात भारती लव्हेकर यांच्या ऐवजी संजय पांडे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. घाटकोपर पश्चिम येथे राम कदम यांचा पत्ता कट होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. घाटकोपर पूर्व येथे पराग शाह यांच्या जागी प्रकाश मेहता यांचे पुनर्वसन होण्याची शक्यता आहे. बोरीवलीत सुनील राणे यांच्या जागी गोपाल शेट्टी यांचे पुनर्वसन होणार असल्याचे समजते.
मुंबईतील ५ विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट दिले न जाण्याची शक्यता आहे. या ५ आमदारांच्या यादीत भाजपच्या घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील विद्यमान आमदार राम कदम यांचे नाव देखील असल्याचे म्हटले जात आहे. त्यासोबतच भारती लवेकर, तमिल सेलवन, पराग शाह, सुनील राणे या विद्यमान आमदारांचा पत्ता देखील कट होण्याची शक्यता आहे.