नवी दिल्ली : देशातील औषधांच्या गुणवत्तेबाबत सरकारने धक्कादायक माहिती उघड केली असून सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या तपासणीत ११२ औषधांचे नमुने गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरले. याचा अर्थ असा की, ही औषधे रुग्णांना बरे करण्याऐवजी नुकसान पोहोचवू शकतात.
या ११२ नमुन्यांपैकी ५२ नमुने केंद्रीय औषध प्रयोगशाळेने तपासले होते, तर ६० नमुने राज्य प्रयोगशाळांनी मानक दर्जाचे (एनएसक्यू) नसल्याचे आढळून आले. छत्तीसगडमधील एका औषधाचा नमुनाही बनावट असल्याचे आढळून आले. आरोग्य मंत्रालयाने अहवाल प्रसिद्ध केला. एका अधिका-याने सांगितले की, औषधांच्या गुणवत्तेची तपासणी दरमहा केली जाते. सप्टेंबरमध्ये अनेक शहरांमधून औषधांचे नमुने गोळा करण्यात आले. चाचण्यांमध्ये असे दिसून आले की, ११२ औषधे एक किंवा अधिक गुणवत्ता मापदंडांमध्ये अपयशी ठरली, जसे की सक्रिय घटकाची योग्य मात्रा गहाळ होणे किंवा इतर काही कमतरता असणे.
अधिका-यांनी सांगितले की, ही समस्या फक्त चाचणी केलेल्या बॅचेसमध्ये आहे. याचा अर्थ असा नाही की कंपनीची इतर औषधे देखील सदोष आहेत. याचा परिणाम सध्या बाजारात असलेल्या इतर औषधांवर होत नाही, ज्यामध्ये अनेक मोठ्या कंपन्यांची औषधे देखील समाविष्ट आहेत.
बनावट औषध सापडले
छत्तीसगडमध्ये आढळलेले बनावट औषध एका विनापरवाना कंपनीने बनवले होते, ज्याने दुस-या कंपनीचे ब्रँड नाव वापरले होते. आरोग्य मंत्रालयाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे आणि चौकशी सुरू केली आहे. दरमहा औषधांची गुणवत्ता तपासणी केली जाते. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) औषधांचे नमुने तपासते. गुणवत्ता चाचणीत अपयशी ठरलेल्या किंवा बनावट असल्याचे आढळलेल्या औषधांची यादी सीडीएससीओ वेबसाइटवर पोस्ट केली जाते. सप्टेंबरमध्ये चाचणी केलेले एकूण ११२ एनएसक्यू नमुने आणि एक बनावट औषध सूचीबद्ध करण्यात आले.
काय आहेत सूचना?
प्रिस्क्रिप्शन तपासा
औषध खरेदी करण्यापूर्वी, त्याचा बॅच नंबर आणि उत्पादन तारीख तपासा. सीडीएससीओ वेबसाइटवर ठरद औषधांची यादी तपासा.
परवानाधारक स्टोअरमधून औषधे खरेदी करा
नेहमी विश्वासार्ह दुकानातून औषधे खरेदी करा.
डॉक्टरांचा सल्ला घ्या
जर तुम्हाला औषधाच्या गुणवत्तेबद्दल काही शंका असेल, तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

