दुर्ग : छत्तीसगडमधील दुर्गमध्ये भीषण अपघात झाला. दुर्ग जिल्ह्यातील कुम्हारी येथे बस ५० फूट खोल दरीत कोसळली. या घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. तर १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी रात्री साडेआठ वाजता घडला.
मंगळवारी (दि. १०) रात्री ड्युटीवरून परतत असताना कर्मचा-यांनी भरलेली बस खापरी गावाजवळ आली असता अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस ५० फूट खोल दरीत पडली. बसमध्ये केडिया डिस्टिलरी फॅक्टरीचे सुमारे ४० कर्मचारी प्रवास करत होते. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.
या अपघाताबद्दल पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केले आहे. ‘एक्स’ वर त्यांनी लिहिले आहे की, ‘‘छत्तीसगडच्या दुर्गमध्ये झालेला बस अपघात अत्यंत दु:खद आहे. ज्यांनी यात आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रति मी शोक व्यक्त करतो. यासोबतच जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो, अशी मी कामना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे.
राष्ट्रपतींनी केले दु:ख व्यक्त
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले की, ‘छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात अनेकांच्या मृत्यूची बातमी अतिशय दु:खद आहे. सर्व शोकग्रस्त कुटुंबीयांबद्दल माझ्या मनापासून संवेदना. जखमी लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो.