जालना : अवैध गर्भलिंगनिदान, गर्भपात प्रकरणात जालना एलसीबीने केलेल्या तपासात आता जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलडाण्यातील ९ डॉक्टरांसह आणखी १२ डॉक्टरांना नव्याने आरोपी करण्यात आले आहे. पकडलेल्या नाना सहाणे आणि बुलडाण्यातील डॉ. विजय प्रभाकर सोळुंके याला न्यायालयाने २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
जुलै २०२४ मध्ये भोकरदन येथील अवैध गर्भलिंग निदान केंद्राचा पर्दाफाश झाला होता. त्या प्रकरणात १५ जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्यातील १४ जणांना आजवर अटक करण्यात आली आहे. विशेषत: नाना सहाणेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर तो १२ जानेवारी रोजी पोलिसांना शरण आला होता. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर बुलडाण्यातील अवैध गर्भपात करणा-या डॉ. विजय सोळुंके याचे नाव समोर आले.
एकूण २७ आरोपी
अवैध गर्भपात प्रकरणात प्रारंभी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील १४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या तपासात आता नव्याने १२ जणांची नावे समोर आली असून, त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता २७ आरोपी झाले आहेत.
इतर कर्मचा-यांचाही समावेश
तब्बल नऊ डॉक्टरांसह इतर कर्मचारी अशी १२ जणांची नावे समोर आली आहेत. त्यात डॉ. राजेंद्र ऊर्फ राज काशीनाथ सावंत (रा.जाधववाडी, छत्रपती संभाजीनगर), डॉ. मोहिनी विजय सोळंकी (रा. सोळंकी हॉस्पिटल, बुलडाणा), डॉ. प्रमिला सोळंकी (रा. रविदीप हॉस्पिटल, बुलडाणा), डॉ. सुलक्षणा अग्रवाल (रा. अग्रवाल हॉस्पिटल, चिखली जि. बुलडाणा), डॉ. संगीता देशमुख देऊळघाट, डॉ. दीपिका थत्ते (थत्ते हॉस्पिटल गांधीचमन, जालना), डॉ. सुनीता सुभाष सावंत (सावंत हॉस्पिटल भोकरदन), डॉ. रवी वाघ (रा. रविदीप हॉस्पिटल, भोकरदन), साकोळकर हॉस्पिटलमधील डॉक्टर (रा. छत्रपती संभाजीनगर), मीरा सिस्टर (जालना), जायदा बेगम (रा. छत्रपती संभाजीनगर), सुधाकर हिवाळे (रा. भोकरदन) या १२ जणांची नावे समोर आली असून, त्यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. संबंधितांचाही शोध सुरू असल्याचे तपासाधिकारी सपोनि. योगेश उबाळे यांनी सांगितले.