लातूर : प्रतिनिधी
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लातूर शहरात पूर्वी ४८०८ घरकुले मंजूर झालेली असून आता नव्याने १२२३ लाभधारकांचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाला आहे.शहरातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घेत लवकरात लवकर बांधकामे सुरु करावीत,असे आवाहन आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना असून लातूर शहर महानगरपालिके मार्फत ती राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे स्वत:ची जागा आहे परंतु पक्के घर नाही व ज्यांचे वार्षिक उत्पन्न रुपये ३.०० लक्षच्या आत आहे अशा नागरिकांना लाभ देण्यात येतो.यात लाभधारकाने बांधकाम स्वत: करून घ्यावयाचे आहे.त्यासाठी टप्प्याटप्प्याने २.५० लक्ष रुपयांचे अनुदान दिले जाते. आतापर्यंत शहरात या योजनेतून ४८०८ घरकुले मंजूर झाली असून त्यापैकी ३८७७ लाभधारकांनी घरकुलाचे काम सुरु केले आहे. यापैकी २७७१ बांधकामे पूर्ण झाली असून ११०६ घरकुलांची कामे सुरु आहेत.
मनपाने मार्च २०२३ मध्ये १२२३ लाभधारकांच्या घरकुलाचा प्रस्ताव नव्याने शासनाकडे सादर केला होता.तो देखील मंजूर झाला आहे.या योजनेअंतर्गत आतापर्यंत १०३ कोटी २ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी ८४ कोटी ७१ लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहेत. उर्वरित निधी खर्च करण्याची कार्यवाही सुरु आहे. ज्या लाभधारकांनी अद्याप घरकुलाचे काम सुरू केलेले नाही त्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून कामे सुरू करावीत.विहित कालावधीत बांधकाम पूर्ण करून घेऊन योजनेचा लाभ घ्यावा. लाभधारकांनी काम सुरु केले नाही तर मंजूर झालेले घरकुल रद्द करण्याची कार्यवाही प्रशासनाकडून केली जाईल,अशी माहितीही आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दिली.