मुंबईतील कार्यक्रमात संवाद टाळला
मुंबई : प्रतिनिधी
मुंबईत झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद टाळल्याचे चित्र समोर आले आहे. हुतात्मा चौकातील अभिवादन कार्यक्रमात फडणवीस आणि शिंदे यांच्या देहबोलीत स्पष्ट दुरावा दिसून आला. अभिवादन केल्यानंतर शिंदे यांनी फडणवीस यांच्याकडे पाठ फिरवून उभे राहणे, या घटनेने महायुतीतील नेत्यांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत दिले आहेत.
या घटनेनंतर नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ््याच्या अनावरण कार्यक्रमाला एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिले. या कार्यक्रमाच्या पत्रिकेत त्यांचे नाव असूनही त्यांच्या गैरहजेरीमुळे गणेश नाईक यांनी पुतळ््याचे अनावरण केले. कल्याण-डोंबिवलीतील फोडाफोडीच्या राजकारणामुळे शिंदे नाराज असल्याची माहिती आहे. त्यांनी यासंदर्भात दिल्लीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची अमित शाह यांच्याकडे तक्रार केल्याचेही वृत्त आहे.
यापूर्वीही शिंदे गटाच्या मंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीला दांडी मारली होती तर शिंदे यांनी आझाद मैदानातील पोलिसांच्या कार्यक्रमाला जाणे टाळले होते. जिथे फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ््यालाही शिंदे आणि फडणवीस-अजित पवार वेगवेगळ््या विमानांनी प्रवास करताना दिसले. ज्यामुळे त्यांच्यातील दुराव्याची चर्चा अधिक तीव्र झाली आहे.

