मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते २३ मार्च २०२४ या कालावधीत तर दहावीची लेखी परीक्षा १ मार्च ते २६ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्रची (१२ वी) लेखी परीक्षा होणार आहेत. इयत्ता १० वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दि. १० फेब्रुवारी २०२४ ते गुरुवार दि. २९ फेब्रुवारी २०२४ व इयत्ता १२ वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दि. २ फेब्रुवारी २०२४ ते मंगळवार दि. २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत होणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा कधी सुरू होणार, याबद्दल विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता होती. मात्र, आज परीक्षेची तारीख जाहीर झाल्याने विद्यार्थी पुन्हा अभ्यासाच्या तयारीला लागणार आहेत.