24.5 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeमहाराष्ट्रबारावी गणिताचा पेपर मोबाईलवर लीक

बारावी गणिताचा पेपर मोबाईलवर लीक

बोर्डाचा मात्र स्पष्ट नकार

नागपूर : राज्य शिक्षण मंडळाचा शनिवारी असलेला इयत्ता बारावीचा गणिताचा पेपर परीक्षा सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी मोबाईलवर व्हायरल झाल्याच्या चर्चेने पुन्हा यंत्रणेच्या दक्षतेवर प्रश्न निर्माण केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गणिताच्या प्रश्नपत्रिकेतील ‘सेक्शन ए’ चे प्रश्न पेपर सुरू होण्यापूर्वी मोबाईलवर व्हायरल झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील ब-याच केंद्राबाहेर यावरून संशयास्पद हालचाली बघायला मिळाल्याची चर्चा आहे. मात्र विभागीय मंडळाने अशाप्रकारे प्रश्नपत्रिका व्हायरल होण्याच्या माहितीला स्पष्ट नकार दिला.

शनिवारी सकाळी ११ वाजतापासून पेपर सुरू होणार होता. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहरातील एका केंद्रावरून सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास गणिताच्या प्रश्नपत्रिकेतील काही भाग मोबाईलवर बाहेर आल्याचे सांगण्यात येत आहे. हा भाग ‘सेक्शन ए’ मधील पर्यायवाचक प्रश्नांचा होता. सेक्शन ए च्या आठ प्रश्नांसाठी १६ गुण आहेत. हाच भाग मोबाईलने व्हायरल करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या उत्तरांचे पर्याय असलेला कागदही मोबाईलवर फिरत होता. यासाठी काही केंद्राबाहेर तरुणांच्या संशयास्पद हालचालीही दिसून आल्याची समोर आले आहे. यामुळे गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा दिवसभर चालली होती. मात्र पेपर फुटल्याची शक्यता बोर्डाच्या अधिका-यांनी धुडकावून लावले आहे. अशाप्रकारची कुठलीही घटना समोर आली नसल्याचे बोर्डाने स्पष्ट केले.

निव्वळ अफवा : शिक्षण विभाग अध्यक्ष
जिल्हाधिका-यांपासून पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक व सर्व यंत्रणा परीक्षेसाठी अलर्ट मोडवर आहे. मलाही याबाबत फोन आला होता, मात्र त्यांच्याकडे असला कुठलाही पुरावा नव्हता. पुरावा असता तर लगेच सायबर गुन्हे शाखेला कळवून ताबडतोब कारवाई होऊ शकली असती, पण तसे काहीच घडलेले नाही. त्यामुळे पेपर व्हायरल झाल्याची माहिती निव्वळ अफवा असल्याचे विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनी म्हटले आहे.

शिक्षक, कर्मचा-यांचेही मोबाईल काढा
परीक्षेला जाणा-या विद्यार्थ्यांकडून मोबाईल व इतर इलेक्ट्रानिक्स उपकरणे काढली जातात. त्याचप्रमाणे परीक्षेत केंद्र प्रमुख, निरीक्षक असलेले शिक्षक व शाळेतील कर्मचा-यांनाही मोबाईल नेण्यास मनाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. केंद्रात जाण्यापूर्वीच त्यांचेही मोबाईल का काढण्यात येऊ नये, असे विचारले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR