नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या जागतिक यादीत भारतातील १३ शहरांचा समावेश झाला आहे. सोमवारी दुपारी समोर आलेल्या हवेच्या गुणवत्तेच्या आकडेवारीनुसार, जगातील सर्वाधिक प्रदूषण असलेल्या २० शहरांमध्ये भारतातील १३ शहरांचा समावेश होता. विशेष म्हणजे, भारतातील वाढत्या वायुप्रदूषणासाठी वारंवार चर्चेत असणा-या दिल्लीचा मात्र या यादीत समावेश नव्हता.
एक्यूआय.कॉम या संकेतस्थळावरील १९ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजताच्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशातील बुलंदशहरने जगात तिसरा क्रमांक पटकावला. शहराचा वर एक्यूआय निर्देशांक १९८ नोंदवण्यात आला. हा स्तर आरोग्यासाठी घातक मानला जातो. त्रिपुराची राजधानी आगरतळा १८१ एक्यूआय निर्देशांकासह चौथ्या क्रमांकावर होती. भारतातील इतर शहरांमध्ये राजस्थानातील पाली आणि उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर या दोन्ही शहरांचा एक्यूआय निर्देशांक १७४ नोंदवण्यात आला.
मध्य प्रदेशातील बुरहानपूरमध्येही १७४ एक्यूआय नोंदवण्यात आला, तर हरियाणातील रोहतकचा निर्देशांक १७२ होता. राजस्थानातील कोटा येथे एक्यूआय निर्देशांक १७० नोंदवण्यात आला. मुंबईचा निर्देशांक १६७ होता. उत्तर प्रदेशातील हापूरमध्ये १६६, हरियाणातील हिसारमध्ये १६५, राजस्थानातील बिकानेरमध्ये १६५ आणि उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये १६४ एक्यूआय नोंदवण्यात आला. या आकडेवारीमुळे ही शहरे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत समाविष्ट झाली. या जागतिक यादीत इंडोनेशियातील अनेक शहरांचाही समावेश होता. मध्य कालीमंतान प्रांतातील पालंगकाराया हे शहर २४२ वर एक्यूआय निर्देशांकासह पहिल्या क्रमांकावर होते. हा स्तर गंभीर प्रदूषणाच्या श्रेणीत येतो. इंडोनेशियातील पालेमबांग शहराचा एक्यूआय निर्देशांक २०७ होता. या शहराचाही गंभीर प्रदूषणाच्या श्रेणीत समावेश करण्यात आला.
इंडोनेशियातील संपित आणि जांबी ही शहरे अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर होती. संपितचा एक्यूआय निर्देशांक १८०, तर जांबीचा १७६ नोंदवण्यात आला. याशिवाय मलेशियातील पुत्रजया, क्वालालंपूर आणि पेटालिंग जया या शहरांचाही जगातील सर्वाधिक प्रदूषित २० शहरांच्या यादीत समावेश होता. ही क्रमवारी १९ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजताच्या एक्यूआय.इन वरील आकडेवारीवर आधारित आहे. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक वेळेनुसार बदलत असल्याने ही आकडेवारी त्या वेळेची स्थिती दर्शवते.
भारतातील १३ प्रदूषित शहरांची यादी
बुलंदशहर(यूपी): एक्यूआय १९८ (जागतिक पातळीवर तिस-या क्रमांकावर, अतिशय धोकादायक हवा)
अगरतळा (त्रिपुरा): एक्यूआय १८१ (यादीत चौथ्या स्थानावर)
पाली (राजस्थान): एक्यूआय १७४
मुझफ्फरनगर (यूपी): एक्यूआय १७४
बुरहानपूर (मध्य प्रदेश): एक्यूआय १७४
रोहतक (हरियाणा): एक्यूआय १७२
कोटा (राजस्थान): एक्यूआय १७०
मुंबई (महाराष्ट्र): एक्यूआय १६७ (महाराष्ट्रातील एकमेव प्रमुख शहर)
हापूर (यूपी): एक्यूआय १६६
हिसार (हरियाणा): एक्यूआय १६५
बिकानेर (राजस्थान): एक्यूआय १६५
बरेली (यूपी): एक्यूआय १६४
गाझियाबाद (यूपी): एक्यूआय १६० पेक्षा जास्त
















