आगरतळा : त्रिपुरामध्ये अवैधरित्या भारतात प्रवेश करणाऱ्या १४ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. त्रिपुरातील गोमती जिल्ह्यात रविवारी चार मुलांसह चौदा बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुप्त माहितीच्या आधारे, आंतरराष्ट्रीय सीमेजवळील बैष्णबपूर गावात दोन घरांवर छापे टाकण्यात आले आणि १४ अवैध स्थलांतरितांना अटक करण्यात आली, असे सबरूम पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अपू दास यांनी सांगितले.
प्रभारी अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी या बांगलादेशी नागरिकांना आश्रय देणाऱ्या तीन स्थानिक लोकांनाही अटक केली आहे. दास म्हणाले की, भौगोलिक समस्यांमुळे सबरूम उपविभागातील ६२ किमी लांबीच्या सीमेला पूर्णपणे कुंपण घालता आले नाही, त्यामुळे मानवी तस्करांकडून त्याचा वापर केला जात आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिस मानवी तस्करीबाबत शून्य सहनशीलता दाखवत आहेत. घुसखोरीला मदत केल्याचा आरोप असलेल्यांवर मानवी तस्करीशी संबंधित कठोर आरोपांखालीही गुन्हे दाखल केले जात आहेत.