नवी दिल्ली : निवडणूक आयोगासाठी निवडणुकीच्या प्रक्रियेत मदत व्हावी म्हणून सरकारी कर्मचारी असलेल्या व्यक्तींची ब्लॉक लेव्हल ऑफिसर म्हणून नेमणूक केली जाते. पण गेल्या काही दिवसांत तब्बल १४ बीएलओंनी आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आले आहेत.
निवडणुकीच्या कामकाजाचा प्रचंड तणाव असल्याने तसेच आता हे सहनशिलतेच्या बाहेरचे असल्यानं आपण जीवन संपवत आहोत, अशा सुसाईड नोट लिहीत काही बीएलओंनी स्वत:चे जीवन संपवले आहे. त्यामुळे या बीएलओंच्या डोक्यावर नेमके कुठले ओझे आहे? असा सवाल विचारला जात आहे.
गेल्या काही दिवसांत ज्या बीएलओंचा मृत्यू झाला त्यामध्ये सर्वाधिक मध्य प्रदेशातील ४ तर राजस्थानातील ३ जणांचा समावेश आहे. तसेच गुजरातमधील २, पश्चिम बंगालमधील २, केरळातील १ आणि तामिळनाडूतील २ जणांचा समावेश आहे. माध्यमातील विविध वृत्तांनुसार, गुजरातच्या गिर सोमनाथ जिल्ह्यातील कोडिनार तालुक्यातील छारा गावात एसआयआरचे काम करत असलेले बीएलओ (शिक्षक) अरविंद वाढेर यांनी कामाच्या तणावातून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे. तसेच शिक्षक संघटनांमध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला आहे.
४० वर्षीय बीएलओ वाढेर यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या पत्नीला पत्र लिहिले, यामध्ये ते म्हणतात, माझ्याकडून आता हे एसआयआरचे काम होणार नाही. मी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दमलो असून मला प्रचंड तणावही आला आहे. तू मुलाची आणि स्वत:ची काळजी घे. माझे तुमच्या दोघांवर खूप प्रेम आहे. पण मी आता खूपच असहाय्य झालो आहे. त्यामुळे माझ्याकडे आत्महत्येशिवाय आता दुसरा पर्याय राहिलेला नाही.
गुजरातच्याच खेडा इथे देखील एका बीएलओने आपले जीवन संपवले आहे. तसेच जलपाईगुडी (प. बंगाल) मध्ये एका बीएलओने आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. राजस्थानात अशीच दोन प्रकरणे समोर आली आहेत. यांपैकी एका बीएलओचा तणावातून हार्टअटॅकने मृत्यू झाला. तर जयपूरमध्ये एका सरकारी शाळेतील शिक्षकाने १६ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. या शिक्षकाच्या कुटुंबियांनी आरोप केला की मतदार यादीशी संबंधित कामासाठी ते प्रचंड दबावाखाली काम करत होते.
तर तामिळनाडूच्या कुंभकोणम इथे एका वरिष्ठ अंगणवाडी कर्मचारी आणि बीएलओ म्हणून काम करणा-या महिलेने मतदार याद्यांच्या कामामुळे तणावग्रस्त होऊन झोपेच्या ४४ गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तसंच केरळच्या कुन्नूर इथं एका बीएलओने एसआयआरशी संबंधित तणावातून स्वत:च जीवन संपवले. पश्चिम बंगालच्या पूर्ण वर्धमान जिल्ह्यात ९ नोव्हेंबर रोजी एका बीएलओचा ब्रेन स्ट्रोकने मृत्यू झाला. त्यांना ब्रेन स्ट्रोक हा मानसिक ताणतणावातूनच झाला असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे.

