सोलापूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अखेर जिल्हा परिषद मुख्य प्रवेशद्वारातील(पूनम गेट) १४ अतिक्रमित लोखंडी खोकी पुन्हा हटविण्यात आली. संबंधित १२ जणांनी आपली खोकी स्वत:हून काढून घेतली तर दोन खोकी महापालिका पथकाने जेसीबीच्या साह्याने निष्काशीत केली. या कारवाईमुळे जिल्हा परिषद प्रवेशद्वाराने मोकळा श्वास घेतला.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारात मोठ्या प्रमाणात आंदोलने होत असतात. मात्र याच फुटपाथवर अनधिकृतपणे काही जणांनी खोकी थाटली होती. काही महिन्यापूर्वी महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने ती हटविली होती. दरम्यान, न्यायालयाने जैसे थे स्थितीचा आदेश दिला होता. तरीही उच्च न्यायालयात धाव घेत येथील संबंधित लोकांनी पुन्हा त्या फुटपाथवर खोकी थाटली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाने याप्रकरणी निर्णय दिला. त्यानुसार अखेर महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभाग आणि सदर बझार पोलिस यांच्या माध्यमातून येथील १४ खोके हटविण्याची संयुक्त कारवाई करण्यात आली. यावेळी कारवाई पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
पालिका आयुक्त शितल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त तैमूर मुलाणी आणि सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात रस्त्यावर तसेच फुटपाथवर रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आज येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने ही करवाई करण्यात आली. या मोहिमेत महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख हेमंतकुमार डोंगरे, मनोज पाटोळे उपस्थित होते. सोलापूर शहरातील नागरिक व व्यापा-यांनी रस्त्यावर तसेच फुटपाथवर अतिक्रमण करू नये. अतिक्रमण आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख हेमंतकुमार डोंगरे यांनी दिला आहे.