22.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeराष्ट्रीयअल कायदाशी संबंधीत १४ जणांना अटक

अल कायदाशी संबंधीत १४ जणांना अटक

'अल कायदा' विरोधात पोलिसांची मोठी कारवाई

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अल कायदाच्या भारतातील मोड्यूलचा भांडाफोड केला. झारखंड, राजस्थान आणि उत्तर प्रदेश पोलिसांसमवेत संयुक्त कारवाई करत दिल्ली पोलिसांनी चौदा जणांना अटक केली.
गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाई केल्याचे सांगण्यात आले. या मोड्यूलला रांचीचा डॉक्टर इश्तियाक हाताळत होता आणि तो त्याच्या मदतीने देशात घातपाती कारवाया घडवून आणण्याचे कारस्थान रचत होता.

मोड्यूलमध्ये सहभागी असलेल्या तरुणांना शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी दिले जात होते. प्रामुख्याने हे प्रशिक्षण राजस्थानच्या भिवाडी येथे दिले जात होते. तेथे सहा जणांना अटक केली आहे. घटनास्थळावरून एके ४७ रायफल, ३८ बोर रिव्हॉल्वरचे सहा काडतूस, ३२ बोर रिव्हॉल्वरचे तीस काडतूस, एके-४७ चे तीस काडतूस, एक एयर रायफल, हँड ग्रेनेडसह अनेक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.

याशिवाय झारखंड आणि उत्तर प्रदेशातील एकूण सुमारे आठ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सध्या विविध ठिकाणांवर तपास सुरू असून आणखी काही अटकसत्र राबविण्याची शक्यता आहे. अन्य ठिकाणावरूनही शस्त्रसाठाही जप्त करण्यात आले.

झारखंड एटीएसचे छापासत्र
झारखंड दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ने आज झारखंडच्या विविध भागात छापे घातले. एटीएसने अल कैदाचे स्लिपर सेल म्हणून काम करणा-या ‘अल कायदा इन द इंडियन सब कॉन्टिनंट’ संघटनेच्या सात लोकांना ताब्यात घेतले आहे. ‘एक्यूआयएस’च्या स्लीपर सेलच्या एजंटची माहिती मिळाल्यानंतर आज सकाळपासून छापासत्र सुरू झाले.
यादरम्यान रांची, हजारीबाग, लोहरदगा येथे चौदा ठिकाणी छापे घालण्यात आले. पोलिस अधीक्षक (एटीएस) ऋषभ झा म्हणाले, छापासत्र अजूनही सुरू असून या संघटनेशी काम करणा-या सात जणांना ताब्यात घेतले आहे. पुराव्याची तपासणी केली जात आहे. या आधारावरच त्यांना अटक केली जाईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR