सोलापूर : शेअर बाजार मध्ये गुंतवणूक करण्याचे व मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवून माजी नगरसेवक पुत्रासह इतर ठेवीदारांकडून तब्बल १५ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शेअर बाजार सल्लागाराला ३ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश जे जे मोहिते यांनी दिला.
निवृत्ती मारुती पैलवान (रा. १०५, आर्यश रेसिडेन्सी, एसआरपीएफ कॅम्प जवळ, विजापूर रोड, सोलापूर) असे पोलिस कोठडी मिळालेल्याचे नाव आहे. याबाबत आशिष अशोक पाटील (वय २५, रा. न्यू संतोष नगर, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्ती पैलवान याने सोलापूर येथील न्यू संतोष नगर जुळे सोलापूर येथील राहणारे माजी नगरसेवक पुत्र आशिष अशोक पाटील यांचा विश्वास संपादन करून त्यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगून त्यांना ५ टक्के दराने मोबदला देण्याचे आमिष दाखविले.
त्यामुळे पाटील यांच्याकडून पैलवान याने वेळोवेळी रोख व ऑनलाईनच्या माध्यमातून एकूण ८० लाख रुपये घेऊन त्यांना ठरल्याप्रमाणे कोणताही मोबदला न देता त्यांचा विश्वासघात करून फसवणूक केली. याप्रकरणी आशिष पाटील यांनी विजापूर नाका पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने आरोपी निवृत्ती मारुती पैलवान व त्यांची पत्नी सुरेखा निवृती पैलवान यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्याची व्याप्ती ही मोठी असल्याने सदर गुन्ह्याचा तपास गुण्याचा तपास हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासांमध्ये आरोपी निवृत्ती पैलवान यांनी एकूण १२४ ठेवीदारांकडून शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याचे व मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १५ कोटी ४० लाख रुपयाची फसवणूक झाल्याची बाब निष्पन्न झाली.
तसेच सदर फसवणुकीची रक्कम हे मोठे असल्याने व अनेक गुंतवणूकदारांना त्यांनी फसवणूक केल्याने महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संबंधाचे संरक्षण कलम ३ प्रमाणे कलम वाढ करून निवृत्ती पैलवान यास २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सोलापूर येथील विशेष न्यायाधीश जे.जे. मोहिते यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायाधीश मोहिते यांनी पैलवान यास ३ दिवस पोलिस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सुनिल दोरगे करीत आहेत. याप्रकरणांमध्ये मूळ फिर्यादीच्यावतीने अॅड. रियाज एन शेख, सरकार पक्षातर्फे अॅड. माधुरी देशपांडे यांनी तर आरोपी तर्फे अॅड. विद्यावंत पांढरे यांनी काम पाहिले.