23.6 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeराष्ट्रीयरेल्वे अपघातात १५ ठार

रेल्वे अपघातात १५ ठार

कोलकाता : वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये जलपाईगुडी येथे कंचनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीची भीषण धडक झाली. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला तर ६० जण जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या अपघाताची माहिती मिळताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्­यनाथ यांनी शोक व्यक्त केला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घडनास्थळावर जात पाहणी केली.

सियालवाहकडे जाताना कंचनजंगा एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला. कंचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडी धडकल्यानंतर रेल्वेचे काही डब्बे रुळावरून घसरले. ही धडक इतकी भीषण होती की, कंचनजंगा एक्स्प्रेसचे अनेक डब्बे ट्रॅकवरून खाली घसरले. सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी तातडीने पश्चिम बंगाल जलपाईगुडी स्टेशनजवळ रंगापानी येथे घटनास्थळावर भेट देत पाहणी केली. मोठी वाहने जाण्यासाठी रस्ता अरुंद असल्याने अपघातस्थळी जाण्यासाठी रेल्वेमंत्र्यांना दुचाकीवरून जावे लागले. ईशान्य फ्रंटियर रेल्वेच्या अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी रंगपानी स्टेशनजवळ एका मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला मागून धडक दिली. त्यामुळे एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळावरून घसरले तर काही डबे दुस-या डब्यावर जाऊन आदळले. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली.

पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघात फारच दु:खद आहे. आपले प्रियजन गमावलेल्या लोकांप्रती माझ्या संवेदना आहेत. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी मी प्रार्थना करतो. अधिका-यांशी बोलून तेथील परिस्थिती जाणून घेतली. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी बचावकार्य सुरू आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख देणार
अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत देण्याची घोषणा केली. यासोबतच गंभीर जखमींना २.५ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

पंतप्रधानांना दु:ख
पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले. दरम्यान, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीकडून मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. तसेच अपघातातील जखमींना ५० हजार रुपये दिले जाणार आहेत, असे पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR