मुंबई : आमदार अपात्रतेबाबत अद्याप कोणताही निकाल लागलेला नसला तरी ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांतून एकमेकांवर टीकास्त्र सोडले जात आहे. अशात शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तसेच त्यांनी ठाकरे गटाचे नेते यांच्या निशाणा साधला आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, अपात्रतेच्या निकालाची चिंता करू नये. सरकार काही जाणार नाही. जाणार असतील तर ते जाणार आहेत. ३१ डिसेंबर नंतर टाकणारे गटाचे १५ आमदार शिवसेना शिंदे गटाकडे असतील हे तुम्हाला निश्चित सांगतो, असे संजय शिरसाट यांनी ठामपणे सांगितले.
शिंदे आणि ठाकरे गटाच्या परस्परविरोधी एकूण ३४ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिका सहा गटात वर्गिकरण करण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या परस्परविरोधातील आमदार अपात्रता याचिकांवर येत्या ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घ्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राहुल नार्वेकर यांना दिले आहेत. आमदार अपात्रता याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यात यावी असे ठाकरे गटाचे मत होते. मात्र शिंदे गटाच्या वकिलांकडून याला विरोध करण्यात आला होता. प्रत्येक आमदाराची बाजू ऐकून घ्यावी असे शिंदे गटाचे म्हणणे होते. तसेच पुरावे सादर करण्यासाठी अधिक वेळ मागितला होता.