27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रविसर्जन सोहळ्याला गालबोट; राज्यात १५ जणांचा मृत्यू

विसर्जन सोहळ्याला गालबोट; राज्यात १५ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी
‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ अशा जयघोषात फुलांची मनसोक्त उधळण करत उत्साह आणि भावपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला राज्यभरात निरोप दिला. भक्तीमय वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. पुढच्या वर्षी लवकर या, असे म्हणत जड अंत:करणाने गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप दिला. पण याच उत्सवाला राज्यात अनेक ठिकाणी गालबोट लागले आहे. राज्यभरात १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, लाडक्या गणरायाला मंगळवारी निरोप देण्यात आला. या दरम्यान राज्यात अनेक दुर्घटना समोर आल्या असून धुळ्यात ट्रॅक्टरखाली चिरडून ३ बालकांचा मृत्यू झाला. तर नाशिक, अमरावतीमध्ये काही जण वाहून गेले. जिंतूरमध्ये डीजेच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू झाला. गणपती विसर्जनावेळी राज्यात १३ जणांचा मृत्यू झाल्याचे आतापर्यंत समोर आले आहे.

नाशिकमध्ये ३ वाहून गेले
गणपती विसर्जनाला गेलेल्या दोन युवकांचा वालदेवी नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात ही घटना घडली. ओंकार गाडे आणि स्वयंम मोरे अशी दोघा मृत युवकांची नावे आहेत. दोघे जण मंगळवारी संध्याकाळी मित्रांसोबत गणपती विसर्जनासाठी गेले असता नदीपात्रातील एका खड्ड्यात पडले.

अमरावती जिल्ह्यात तिघे बुडाले
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जनादरम्यान तीन जण वाहून गेले. पूर्णा नगर नदीपात्रात तीन जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये मयूर गजानन ठाकरे, अमोल विनायक ठाकरे यांचा समावेश आहे. दर्यापूर तालुक्यातील दारापूर येथील गणपती विसर्जनादरम्यान राजेश संजय पवार हा २७ वर्षीय युवक पाण्यामध्ये बुडाला आहे.

अहमदनगरमध्ये दोन जणांचा मृत्यू
गणपती विसर्जनादरम्यान दोन युवकांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. अजिंक्य नवले (वय १६ वर्षे) आणि केतन शिंदे (वय १८ वर्षे) अशी मयत युवकांची नावे आहेत. स्थानिक नागरिक आणि महापालिका आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जिंतूरमध्ये एकाचा मृत्यू
जिंतूर तालुक्यातील मौजे चांदज येथे सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जनादरम्यान कर्परा नदीमध्ये भागवत कल्याण अंभोरे (वय १३ वर्षे) मुलगा वाहून गेला. डीजेच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. डीजेच्या आवाजामुळे एका ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाल्याची घटना परभणीच्या जिंतूर शहरात घडली.

धुळ्यात मिरवणुकीत ३ बालकांचा चिरडून मृत्यू
धुळ्यातील चितोड येथे मंगळवारी गणपती मिरवणुकीवेळी ट्रॅक्टरखाली आल्याने तीन बालकांचा जागीच मृत्यू झाला. मिरवणुकीत गाण्याच्या तालावर सर्व कार्यकर्ते नाचत होते. मद्यधुंद असलेल्या चालकाने ट्रॅक्टर अचानक सुरू केला. त्या ट्रॅक्टरखाली आल्याने तीन लहान बालकांचा मृत्यू झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR