ग्वालियर : इन्स्टाग्रामवर रिल बनवणे अनेकांसाठी फॅशन बनले आहे. नुकतेच सोशल मीडियावर एक व्हीडीओ व्हायरल झाला होता ज्यात वृद्धाने रस्त्यावर रिल बनवणा-या एका युवकाने दांडक्याने बेदम मारले. आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. त्यात एका रिलमुळे हजारो लोकांची जीव धोक्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. द लेगेसी प्लाझा इथं रात्री उशिरा भीषण स्फोटाने पूर्ण परिसर हादरून गेला. हा स्फोट पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये झाला, ज्याचे कारण गॅस लीक झाल्याचे सांगितले जात आहे.
याठिकाणी रंजना राणा आणि अनिल राणा नावाचे दोघे कथितपणे गॅस लीक यावर रिल बनवत होते तेव्हा लाईटर पेटवल्याने ही दुर्घटना घडली. या स्फोटात दोघे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलला नेले आहे. या स्फोटामुळे संपूर्ण इमारत हलली, अनेक फ्लॅटचे खूप मोठे नुकसान झाले. काही फ्लॅटचे दरवाजे आणि खिडक्या उखडले गेले तर पार्किंगमध्ये उभ्या असणा-या वाहनांच्या काचा फुटल्या. या घटनेची आता पोलिस चौकशी सुरू असून पुढील तपास करत आहेत.
रात्री २ वाजता झाला स्फोट
ग्वालियर येथील ७ मजली इमारत द लेगेसी प्लाझा अपार्टमेंटमध्ये रात्री २ च्या सुमारास एक जोरदार स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकायला गेला. स्फोट इतका तीव्र होता की एखादा बॉम्ब फुटला की भूकंप झाला असं लोकांना वाटले. या स्फोटामुळे इमारत हादरली. घाबरलेल्या अवस्थेत लोक बाहेर पडले. या स्फोटात पहिल्या मजल्यावरील रंजना राणा आणि अनिल राणा गंभीर जखमी झाले. स्फोटात भाजल्याने त्यांना दोघांना उपचारासाठी तातडीने रूग्णालयात नेण्यात आले.
सिलिंडरमधून गॅस लीक
प्राथमिक तपासात गॅस लीकमुळे सिलिंडर स्फोट झाल्याचे समोर आले. रंजना आणि अनिल दोघे रील बनवत होते, तेव्हा अनिलने लाईटर पेटवले आणि स्फोट झाला. या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या स्फोटात रंजनाच्या फ्लॅटचे सर्वाधिक नुकसान झाले. त्याशिवाय आजूबाजूच्या फ्लॅटचे दरवाजे, खिडक्या उखडल्या. स्फोटामुळे इमारतीतील १०० फ्लॅटचे नुकसान झाले. ५० फ्लॅटच्या खिडकीच्या काचा फुटल्या, १५ हून अधिक वाहनांच्या काचा फुटल्या.
हे तर षडयंत्र, भावाचा दावा
या घटनेतील जखमी अनिलच्या भावाने हे षडयंत्र असल्याचा दावा केला. त्याने सांगितले की, रात्री ९ वाजता वहिनी रंजनाने अनिलला फोन करून बोलावले. काही दिवसांपूर्वी तिने अनिलवर हार चोरीचा आरोप केला होता, ती त्याला त्रास देत होती. ही घटना एखाद्या षडयंत्राचा भाग असेल असा दावा त्याने केला. ज्या घरात स्फोट झाला ते घर रंजना आणि तिचे पती संजीव यांच्या नावावर आहे. या इमारतीत आणखी एक घर रंजनाच्या नावे आहे. ५ महिन्यापूर्वी तिने ते खरेदी केली. पती संजीव हा गावी राहतो. २० दिवसांपूर्वी हे घर भाड्याने दिले होते, परंतु सोमवारी अचानक ते खाली करण्यात आले अशीही माहिती पुढे आली आहे.