नवी दिल्ली/मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. शुक्रवार दि. १९ एप्रिल रोजी सकाळी पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू होईल. म्हणजेच, उद्या देशातील शेकडो उमेदवारांचे भविष्य, कोट्यवधी मतदारांच्या एका बोटात असेल. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी देशातील सर्व मतदारांनी उत्साहाने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केले. त्यांनी एक व्हीडीओ जारी केला, ज्यात मतदानाचा अनुभव शांत, आरामदायी आणि आनंददायी करण्यासाठी निवडणूक आयोगाने कठोर परिश्रम घेतल्याचेही म्हटले.
पहिल्या टप्प्यात उद्या, म्हणजेच १९ एप्रिल रोजी देशातील १०२ लोकसभा मतदारसंघ (जनरल- ७३; एसटी-११; एससी-१८) आणि २१ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील ९२ विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. अरुणाचल आणि सिक्कीममध्ये विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होत आहेत. यामध्ये सर्व टप्प्यांच्या तुलनेत संसदीय मतदारसंघांची संख्या सर्वाधिक आहे. मतदान सकाळी ७ वाजता सुरू होऊन सायंकाळी ६ वाजता संपेल. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, १.८७ लाख मतदान केंद्रे तयार असून १८ लाखांहून अधिक मतदान अधिकारी सज्ज आहेत. उद्या, १६.६३ कोटींहून अधिक मतदार १६२५ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. मतदारांमध्ये ८.४ कोटी पुरुष, ८.२३ कोटी महिला आणि ११,३७१ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
१६२५ उमेदवार निवडणूक रिंगणात
पहिल्या टप्प्यात १६२५ उमेदवार (पुरुष १४९१; महिला १३४) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान आणि सुरक्षा कर्मचा-यांच्या वाहतुकीसाठी ४१ हेलिकॉप्टर, ८४ विशेष गाड्या आणि सुमारे १ लाख वाहने तैनात करण्यात आली आहेत. निवडणुका शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने अनेक निर्णायक पावले उचलली आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी मतदान केंद्रांवर पुरेसा केंद्रीय फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ५० टक्क्यांहून अधिक मतदान केंद्रांवर वेबकांिस्टग केले जाईल. सूक्ष्म निरीक्षकांच्या तैनातीसोबतच सर्व मतदान केंद्रांवर ३६१ निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. ज्यामध्ये १२७ जनरल पर्यवेक्षक, ६७ पोलिस पर्यवेक्षक आणि १६७ आर्थिक पर्यवेक्षक असतील. ८५ वर्षांवरील दिव्यांग मतदारांसाठी पिक अँड ड्रॉप सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
मतदारांसाठी सर्व आवश्यक सुविधा
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, प्रत्येक मतदान केंद्र तळमजल्यावर बांधण्यात आले असून तेथे पिण्याचे पाणी, शौचालय, शेड, रॅम्प, व्हीलचेअर, हेल्प डेस्क आणि मतदारांसाठी स्वयंसेवक असतील. मतदारांना त्यांच्या निवासस्थानी मतदार माहितीच्या स्लिपही पाठवण्यात आल्या आहेत. राजीव कुमार यांनी उन्हाळ्याची तीव्रता पाहता सर्व खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, भारतीय मतदारांचा उत्साह उष्णतेवर मात करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.