सोलापूर – यावर्षी जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली असूनही नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे आणि उजनीतून सोडलेल्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना होवून त्यांच्या उत्पादित उसाच्या वजनात भरीव वाढ झाली अन् यंदाही अपेक्षेपेक्षा जास्तच म्हणजे १६५ लाख मे. टनापेक्षाही जास्तच ऊस गाळप झाल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक पांडुरंग साठे यांनी व्यक्त केली. दरम्यान, सध्या ३३ कारखाने बंद झाले असून, उर्वरित ३ कारखान्याचे येत्या आठवड्यात पट्टे पडणार आहेत. यंदा उसाची लागवडच झाली नसल्याने आगामी वर्षात मात्र ऊस गाळप ५० टक्के खालावणार आहे.
जिल्ह्यातील ३६ साखर कारखान्यांनी आजतागायत १६५ लाख मे. टन ऊस गाळप करून १६० लाख क्विंटलपर्यंत साखर उत्पादित केली आहे. यंदा सरासरी १० टक्केच्याही पुढे साखर उतारा पडला आहे. जिल्ह्यात १ नोव्हेंबरला ऊस गाळप सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले होते. यामुळे गाळप सुरू होवून चार महिने झाले आहेत. सध्या जिल्ह्यातील ३३ साखर कारखाने बंद झाले असून, अजून ३ साखर कारखाने चालू आहेत. यंदा राज्यात ८८ सहकारी व ९२ खासगी असे एकूण १८० साखर कारखाने गाळप करत होते. राज्यातील जवळपास सर्वच कारखान्यांचा पट्टा पडल्याचे सांगण्यात येते.
सोलापूर जिल्ह्यात खाजगी २२ आणि सहकारी १२ असे ३६ साखर कारखाने यंदा गाळप करीत आहेत. यातील ३३ साखर कारखान्यांचा पट्टा पडला आहे. कोल्हापूर विभागात २१ सहकारी व ११ खासगी असे ३२ कारखाने तर पुणे विभागात १६ सहकारी व ११ खासगी असे २७ कारखाने ऊस गाळप करत होते. या सर्वांमध्ये सोलापूर जिल्हा गाळपात आघाडीवर आहे. यंदा दुष्काळी स्थितीमुळे ऊस लागवड कमी प्रमाणात झाली असल्याने आगामी वर्षात ५० टक्के उत्पादन कमी होणार आहे. तर याचा परिणाम म्हणून आगामी वर्षात साखरेचेही भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एफआरपी बाबत बोलताना साठे म्हणाले की, दरवर्षी साखर कारखाने गाळप चालू असेपर्यंत शेतकऱ्यांना ७० ते ८० टक्केपर्यंत बील अदा करीत असतात. मार्च एन्डमध्ये मात्र बँकेची कामे कारखान्यांना असतात; त्यामुळे एप्रिलमध्ये ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करतात. एकंदरीत, साखर कारखान्यांची यंदाची स्थिती चांगली असल्याने शेतकऱ्यांचा एफआरपीसह एक पैसाही बुडणार नाही, अशी माहिती साठे यांनी यावेळी दिली.