21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयओडिशात १७ जणांना जन्मठेपेची शिक्षा

ओडिशात १७ जणांना जन्मठेपेची शिक्षा

भुवनेश्वर : ओडिशामध्ये एका दाम्पत्याला जादूटोण्याच्या संशयावरून जाळून मारल्याप्रकरणी १७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ३ वर्षांपूर्वी ओडिशातील जाजपूर जिल्ह्यात ही घटना घडली होती, त्यानंतर पोलिसांनी १७ जणांना अटक केली होती. सरकारी वकील रजत कुमार राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० साक्षीदार आणि इतर पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश हृषीकेश आचार्य यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.

गुरुवारी (१६ नोव्हेंबर) त्यांनी सर्व १७ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ७ जुलै २०२० रोजी रात्री उशिरा या जोडप्याच्या हत्येची घटना घडली होती. कलिंगनगर परिसरातील निमपली गावात अनेक गावकऱ्यांनी शैला बालमुज आणि सांब्री बालमुज नावाच्या दाम्पत्याच्या घरात घुसून त्यांना बेदम मारहाण केली होती. यानंतर दोघांचाही जळून मृत्यू झाला होता. जादूटोण्याच्या संशयावरून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांचे घरही पेटवून दिले होते.

घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून अजामीनपात्र कलमांखाली खुनाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू केली. एकामागून एक १७ जणांना अटक करण्यात आली. यानंतर घटनास्थळी उपस्थित इतर लोकांची ओळख पटली, त्यापैकी २० जणांना सरकारी साक्षीदार बनवण्यात आले. खून झालेल्या जोडप्याच्या कुटुंबीयांनी एफआयआर दाखल केला होता, त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपपत्र दाखल केले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR