सोलापूर : मागील चार महिन्यात जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या ५०२ अपघातात २७८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अपघाताची संख्या जिल्ह्याचा चिंतेचा विषय बनला आहे. दरम्यान, जिल्ह्यात एक जानेवारी ते ३० एप्रिल या चार महिन्यांत ५०२ अपघातांत २७८ जणांना जीव गमवावा लागला. यात कोणाचा भाऊ, तर कोणाचा एकुलता एक मुलगा, बहीण, आई दगावली.
‘दुर्घटना से देर भली, चुका ध्यान… गई जान…!, यासारखे राष्ट्रीय महामार्गाच्या नजीक अनेक सूचना फलक लावलेले असतात. तरी अपघातांची संख्या व त्यात जाणारे बळी कमी झाले नाहीत. पोलिसांकडून प्रबोधन, दंड यासारखे प्रकार करून देखील अपघात कमी झाले नसून वाढले आहेत. यातील प्रत्येकाचे वेगवेगळे प्रसंग अंगावर शहारे आणणारे आणि वाहतुकीच्या नियमांबाबत विचार करायला लावणारे आहेत. नैसर्गिक मृत्यूपेक्षा जाता-जाता ओढावून घेतलेल्या मृत्यूचे प्रमाण अलीकडे वाढू लागले आहे. ही समाजासाठी चिंतेची बाब आहे. वाहतुकीचे नियम पाळा, असे प्रशासनाने कितीही आवाहन केले तरी प्रत्येकजण आपल्याच धुंदीत वाहन चालवतोय. गाडीचा प्रचंड वेग त्यातच चालकाने मद्यप्राशन केलेले असते.
त्याला ना स्वतःच्या ना रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या जिवाची पर्वा असते. जेव्हा अपघात होतो, तेव्हा त्याच्यासकट सर्वच संपलेले असते. एका चुकीमुळे किती जणांचा जीव जातो. याचा कोणीही विचार करत नाही. केवळ कायदे कडक करून किंवा कारवाया करून काहीही होणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांची जबाबदारी सांभाळली पाहिजे. सतर्क राहुन, वेगाचे नियंत्रण पाळून वाहन चालविल्यास स्वतः सह दुसऱ्याचेही कुटुंब सुरक्षित राहील. जे २७८ जण अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत. त्यातील प्रत्येकाच्या कुटुंबाची दर्दभरी कहाणी चारभितीआड दडलेली आहे. अशा प्रकारचा आघात कोणाच्याही कुटुंबावर होऊ नये. यासाठी वाहतुकीचे नियम पाळा, असे भावनिक आवाहन पोलिसांनी केले आहे.गाड्या अतिवेगाने चालविणे,जड वाहनांना रिफ्लेक्टर नसणे , विरुद्ध (राँग साईड) दिशेने गाडी चालविणे
हेल्मेट परिधान न करणे- सर्वाधिक दुचाकीस्वारांचे अपघात , दारू पिऊन वाहन चालविणे ही वाढत्या अपघातांची कारणे आहेत.
गेल्या चार महिन्यांत हे सर्व अपघात राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग तसेच जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यावर झाले आहेत. सन २०२३ च्या तुलनेत चार महिन्यात १७ टक्के अपघातामध्ये वाढ झाली आहे. सन २०२३ मध्ये एकूण ४५६ अपघातात २४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जानेवारी ते ३० एप्रिल या चार महिन्यात २७८ जणांचा मृत्यू झाला आहे.