28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयनऊ महिन्यांत १७६ दिवस सामान्य हवामानात बिघाड

नऊ महिन्यांत १७६ दिवस सामान्य हवामानात बिघाड

आपत्तींमुळे ८० हजारांहून अधिक घरे उद्ध्वस्त

नवी दिल्ली : सध्या हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा, वाढता पारा, हिमनद्या वितळणे, पूर, वादळे आणि यांसारख्या तीव्र हवामान बदलाच्या घटना वाढत आहेत. दरम्यान, सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंटने जारी केलेल्या ‘एक्सट्रीम वदर रिपोर्ट २०२३’ मध्ये धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. या अहवालात असे म्हटले आहे की, यावर्षी १ जानेवारी ते ३० सप्टेंबर या कालावधीत २७३ दिवसांपैकी १७६ दिवसांमध्ये सामान्य हवामानात बिघाड झाला आहे. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत भारतातील सुमारे ८६ टक्के दिवस सामान्य हवामानापेक्षा कमी नोंदवले गेले आहेत. अशा घटनांचा सर्वाधिक फटका बिहारला बसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. येथे सर्वाधिक मानवी मृत्यूची नोंद झाली आहे. विज्ञान आणि पर्यावरण केंद्रानेही म्हटले आहे की, हवामान बिघाडामुळे झालेल्या नुकसानीचा हा अंदाज वास्तवापेक्षा कमी आहे. कारण प्रत्येक घटनेचा डेटा संकलित केला जात नाही, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान किंवा पीक नुकसानीची गणना केली जात नाही.

अहवालानुसार, मध्य प्रदेशात सर्वाधिक १३८ गंभीर हवामान घटनांची नोंद झाली आहे. खराब हवामानामुळे बिहारमध्ये सर्वाधिक ६४२ मृत्यू झाले आहेत. यानंतर हिमाचल प्रदेशात ३६५ आणि उत्तर प्रदेशात ३४१ मृत्यूची नोंद झाली आहे. याव्यतिरिक्त, पूर सारख्या घटनांमुळे सर्वाधिक घरे नष्ट होण्याचे प्रमाण हिमाचल प्रदेशात आहे. तर पंजाबमध्ये सर्वाधिक प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. दक्षिणेत केरळमध्ये ६७ दिवसांच्या तीव्र हवामानाच्या घटनांची नोंद झाली, ज्यामध्ये सर्वाधिक मृत्यू (६०) झाले. सीएसईने भारतीय हवामान विभागाकडून गोळा केलेल्या आकडेवारीच्या आधारे हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

वीस लाख हेक्टरवरील पिके नष्ट
सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंटने जारी केलेल्या ‘एक्सट्रीम वेदर रिपोर्ट २०२३’ मध्ये म्हटले आहे की, या आपत्तींमुळे वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत २,९२३ मृत्यू झाले आहेत. तसेच वीस लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाली. त्याचवेळी, आपत्तींमुळे ८० हजारांहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आणि सुमारे ९२ हजार जनावरांनाही आपला जीव गमवावा लागला आहे.

फेब्रुवारीने विक्रम मोडले
यंदा जानेवारी महिना सरासरीपेक्षा किंचित उष्ण होता, मात्र या वर्षी फेब्रुवारीने सर्व विक्रम मोडले असून १२२ वर्षांतील सर्वात उष्ण महिना ठरला आहे. त्याच वेळी, १२२ वर्षांमध्ये हा सहावा कोरडा महिना होता. फेब्रुवारी व्यतिरिक्त, ऑगस्ट देखील सर्वात कोरडा होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR