डेहराडून : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे निर्माणाधीन सिल्कयारा बोगद्यातील ४१ कामगारांच्या बचाव कार्याचा बुधवारी ११ वा दिवस आहे. बोगद्याच्या प्रवेश बिंदूपासून, अमेरिकन ऑगर मशीन वापरून सुमारे ४२ मीटरसाठी ८०० मिमी (सुमारे ३२ इंच) पाईप ड्रिल केले गेले आहे. आता सुमारे १८ मीटर ड्रिलिंग बाकी आहे. उर्वरित खोदकाम गुरुवारी सकाळपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ड्रिलिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर येथून आतमध्ये ३२ इंची पाईप टाकण्यात येणार आहे. याद्वारे कामगार बाहेर येतील.
उत्तराखंडच्या रस्ते आणि वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी महमूद अहमद यांनी सांगितले की, ऑगर ड्रिलिंग मशीन सकाळी १२.४५ वाजता सुरू करण्यात आली. आतापर्यंत १८ मीटर खोदकाम करण्यात आले आहे. मला कळविण्यास अतिशय आनंद होत आहे की, एकूण ३९ मीटर ड्रिलिंग पूर्ण झाले आहे. ५७ मीटरच्या जवळ कामगार अडकल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आता फक्त १८ मीटर ड्रिलिंग बाकी आहे. ते लवकरच पूर्ण होईल.
महमूद अहमद यांनी सांगितले की, काहीही सांगणे घाईचे आहे, परंतु बुधवारी रात्री उशिरापर्यंत चांगली बातमी मिळू शकते. टूथब्रश-पेस्ट, टॉवेल, अंडरगारमेंट्स आणि नाश्ता बुधवारी सकाळी कामगारांना पाठवला गेला. कामगारांनी मोबाईल फोन आणि चार्जरचीही मागणी केली होती, तीही त्यांना पाठवण्यात आली आहेत. सर्व कामगार सुखरूप आहेत. ढिगाऱ्यासोबत लोखंडी रॉडही आल्याचे त्यांनी सांगितले.
ढिगारा खाली पडल्याने तसेच ड्रिलिंग मशिन वारंवार बिघडल्याने बचाव कार्य मंदावले होते. गेल्या आठवड्यात, एक मशीन ढिगाऱ्याच्या आतील एका मोठ्या खडकावर आदळली, त्यामुळे बोगद्याच्या छताला तडा गेला आणि तीन दिवसांपेक्षा जास्त काळ ड्रिलिंग थांबले होते.