नवी दिल्ली : सोमालियाच्या समुद्री चाचांनी अपहरण केलेल्या अल नईम आणि एफव्ही इमाम या २ इराणी मच्छिमार नौकेची भारतीय नौदलाने सुटका केली. दोन दिवसांत दोन इराणी मच्छिमार नौकांचं अपहरण झालं होतं. नौदलाच्या आयएनएस सुमित्रा या युद्धनौकेने या दोन्ही नौकांची यशस्वीरित्या सुटका केलीय. अल नईमवर १९ पाकिस्तानी खलाशी होते. तर इमामवर १७ इराणी खलाशी होते.
२८ जानेवारीला इमाम या नौकेकडून अपहरण झाल्याचा एसओएस कॉल नौदलाला आला. आयएनएस सुमित्रा तातडीने मदतीला धावून गेली. इमामची सुटका झाल्यावर काही वेळातच अल नईम या नौकेचं अपहरण झाल्याचा दुसरा कॉल आला. आयएनएस सुमित्रावरच्या नौसैनिकांनी आणि कमांडोंनी साहसी कारवाई करत अवघ्या ३६ तासांत अपहरणाचे दोन कट उधळले.