मॉस्को : रशियाने हजारो युक्रेनियन मुलांचे अपहरण केल्याचा धक्कादायक आरोप होत आहे. ब्रिटनमधील मजूर पक्षाच्या खासदाराने पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या सरकारला विचारले की, रशिया-युक्रेन थांबवण्यासाठी झालेल्या चर्चेत रशियन सैनिकांनी अपहरण केलेल्या १९,५५६ मुलांच्या सुरक्षित परतीचा उल्लेखही होता का? यामुळेच आता त्या हजारो युक्रेनियन मुलांच्या अपहरणाच्या प्रकरणाला वेग आला आहे. ब्रिटिश खासदारांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत ही मुले सुखरूप परत येत नाहीत, तोपर्यंत शांततेची चर्चा होऊ शकत नाही.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध, हे दुस-या महायुद्धानंतरचे सर्वात प्रदीर्घ चाललेले युद्ध आहे. या युद्धात हजारो निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. याशिवाय, अब्जावधी डॉलर्सची संपत्ती नष्ट झाली. अमेरकेसह अनेक देश, हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरच युद्धविरामही होऊ शकतो. मात्र, आता रशियावर एक असा आरोप करण्यात आला आहे, जो ऐकून तुम्हालाही मोठा धक्का बसेल.
ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये चर्चेदरम्यान मजूर पक्षाच्या खासदार जोहाना बॅक्स्टर यांनी पंतप्रधान केयर स्टारमर यांना विचारले की, युक्रेनमध्ये चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्यासाठी रशियाने आधी अपहरण केलेल्या १९,५५६ मुलांना सुरक्षितपणे परत करावी लागेल. या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान केयर स्टारमर म्हणाले, तुमचा राग पूर्णपणे योग्य आहे. या मुलांचे अपहरण करण्यात आले आहे. आम्ही त्यांच्या सुरक्षित परतीची खात्री करू. त्याशिवाय शांतता प्रस्थापित करण्याबाबत कोणतीही चर्चा पुढे जाऊ शकत नाही. हा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल पंतप्रधानांनी खासदाराचे आभार मानले आणि असे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले पाहिजेत, असेही म्हटले.
१९,५४६ मुले बेपत्ता, ५९९ मरण पावली
युक्रेन सरकारचा अंदाज आहे की, २०२२ मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून किमान १९,५०० मुलांना युक्रेनमधून रशियात नेण्यात आले आहे. त्यापैकी केवळ ३८८ मुले त्यांच्या घरी परतली आहेत. या सर्व मुलांचे वय ३ ते १० वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, रशियाने या आरोपावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एका अहवालानुसार या युद्धात सुमारे १९,५४६ मुले बेपत्ता झाली असून, त्यापैकी ५९९ जणांचा मृत्यू झाला आहे.