नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) फेमा प्रकरणात मॅक्रोनियन शिपिंग आणि लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आणि तिचे संचालक विजय कुमार शुक्ला, संजय गोस्वामी आणि त्यांच्या इतर कंपन्यांवर छापे टाकले. छापेमारीत २.५४ कोटी रुपये देखील जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या रकमेचा काही भाग चक्क वॉशिंग मशिनमध्ये लपवण्यात आला होता. याशिवाय छापेमारी दरम्यान आक्षेपार्ह कागदपत्रे आणि अनेक डिजिटल उपकरणेही जप्त करण्यात आली.
इतर कंपन्यांमध्ये लक्ष्मीटन मेरीटाइम, हिंदुस्थान इंटरनॅशनल, राजनंदिनी मेटल्स लिमिटेड, स्टीवर्ट अलॉयज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड; यामध्ये एमएस भाग्यनगर लिमिटेड, विनायक स्टील्स लिमिटेड, वशिष्ठ कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे. त्यांचे संचालक आणि भागीदार संदीप गर्ग आणि विनोद केडिया यांच्या दिल्ली, हैदराबाद, मुंबई, कुरुक्षेत्र आणि कोलकाता येथील ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.
ईडीच्या तपासात या संस्थांनी मोठ्या प्रमाणावर भारताबाहेर विदेशी चलन पाठवल्याचे निदर्शनास आले आहे, जे परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन आहे. गॅलेक्सी शिपिंग अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, सिंगापूर आणि होरायझन शिपिंग अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, सिंगापूर या दोन्ही परदेशी संस्था अँथनी डी सिल्वाद्वारे व्यवस्थापित केल्या जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
छाप्यादरम्यान, मॅक्रोनियन शिपिंग अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आणि लक्ष्मीतान मेरिटाइम या शेल कंपन्यांच्या मदतीने बनावट मालवाहतूक आणि इतर कामांच्या नावाखाली सिंगापूरस्थित संस्थांना १८०० कोटी रुपये दिल्याचे उघड झाले आहे. नेहा मेटल्स, अमित स्टील ट्रेडर्स, ट्रिपल एम मेटल अँड अलॉयज, एचएमएस मेटल अशी या विक्री कंपन्यांची नावे आहेत.
ईडीने गोठवली ४७ बँक खाती
ईडीने संबंधित संस्थांची ४७ बँक खातीही गोठवली आहेत, जेणेकरून त्यांना कोणताही व्यवहार करता येणार नाही. या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी ईडी जप्त केलेली कागदपत्रे आणि उपकरणे तपासत आहे. अशा स्थितीत भविष्यात जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रे आणि उपकरणांमुळे या कंपन्यांच्या खात्यांमधून झालेल्या व्यवहारांबाबत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.