धाराशिव : प्रतिनिधी
कलिंगड व्यापा-याची दोन टेम्पो चालकांनी २ लाख ८४ हजार ९२० रूपयांची आर्थिक फसवणूक केली. टेम्पो चालकांनी टेम्पोत भरलेले कलिंगड हैदराबाद मार्केटला न नेता परस्पर विक्री केले. ही घटना शिराढोण ता. कळंब शिवारातील अवधूत टेळे यांच्या शेतात २६ ते २९ नोव्हेंबर २०२३ दरम्यान घडली. या प्रकरणी शिराढोण पोलीस ठाणे येथे तीघांच्या विरोधात १४ डिसेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिराढोण येथील शेतकरी अवधूत टेळे यांच्या शेतातील कलिंगड कमरोद्दीनपूर ता. देवणी येथील व्यापारी लतीफ बशीर अहमद शेख यांनी खरेदी केले होते. आरोपी प्रसाद क्षिरसागर-बाळी, राजेंद्र उर्फ राज रविंद्र चव्हाण, विजय चव्हाण तिघे रा. खुनेश्वर ता. मोहोळ यांच्या टेंपोत कलिंगड भरले होते. हे कलिंगड फळ विक्री करण्यासाठी हैद्राबाद येथे न नेता आरोपींनी परस्पर विक्री केले. फिर्यादी व्यापारी लतीफ शेख यांची २ लाख ८४ हजार ९२० रूपयांची फसवणूक केली. या प्रकरणी लतीफ बशीर अहमद शेख यांनी दि.१४ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पोलीस ठाणे येथे तीघांच्या विरोधात कलम ४१९, ४२०, ३४ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.