मुंबई : प्रतिनिधी
राजधानी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारने २ कोटी रूपयांची अतिरिक्त आर्थिक मदत केली आहे. संमेलनाच्या नियोजित खर्चामध्ये वाढ अपेक्षित असल्याने साहित्य महामंडळाने अतिरिक्त निधीची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला मान्यता देत विशेष बाब म्हणून निधी मंजूर केला.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्यावतीने २१ ते २३ फेब्रुवारी, २०२५ दरम्यान नवी दिल्ली येथे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन महाराष्ट्रातील इतर भागात होणा-या संमेलनापेक्षा वेगळे आहे. त्यामुळे उद्घाटन समारंभ, साहित्यिक व साहित्य रसिकांचा वाढणारा प्रवास खर्च, निवास व्यवस्था यामध्ये अपेक्षेपेक्षाही नियोजित संख्या वाढल्याने खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे अतिरिक्त २ कोटी रुपये इतका निधी मंजूर करावा, असा प्रस्ताव महामंडळाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला विशेष बाब म्हणून मंजूरी देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य मराठी विकास संस्थेमार्फत निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिली.